मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खासगी कंपन्यांमध्ये एचआर विभाग हा बरेचदा प्रशासकीय कामांसाठी वापरला जातो. मुळात एचआरची नेमणुक कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी असते. पण बहुतांश प्रमाणात तसे होताना दिसत नाही. एअर इंडियासारखी मोठी कंपनीही त्यातून सुटलेली नाही. त्यामुळे वैमानिकांनी थेट रतन टाटांकडे तक्रार केली आहे.
टाटा ग्रुपने एअर इंडियाचे अधिकार प्राप्त केल्यानंतर बरेच बदल झाले. जुने कर्मचारी कायम राहिले आणि बरेच नवेही आले. यातील जवळपास १५०० वैमानिकांनी टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना लांबलचक पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी ‘एचआर आमचे ऐकत नाही’ अशी थेट तक्रार केली आहे. यासोबतच हस्तक्षेप करण्याची मागणीही केली आहे.
रिवाईज सर्व्हिस एग्रीमेंट आणि अपडेटेड सॅलरी स्ट्रक्चरवरून एचआरसोबतचा वाद आता टाटांपर्यंत पोहोचला आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअर एशिया इंडिया अश्या तिन्ही कंपन्या आता पूर्णपणे टाटांच्या मालकीच्या आहेत. एअर इंडिया एक्स्प्रेस सध्या एअर एशिया इंडियामध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे. विस्तारा हा टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाईन्सचा संयुक्त उपक्रम आहे. आता तर एअर इंडिया स्वतः विस्तारामध्ये विलीन होण्याच्या मार्गावर आहे.
उड्डाण भत्ता दुपटीने वाढला
अश्या परिस्थितीत १७ एप्रिलला वैमानिकांसाठी आणि कॅबीन क्रूसाठी नव्या सॅलरी स्ट्रक्चरची घोषणा केली. यात वैमानिकांचा उड्डाण भत्ता दुपटीने वाढवून ४० तास करण्यात आला आहे. इंडियन कमर्शियल पायलट असोसिएशन आणि इंडियन पालय गिल्ड या दोन्ही संस्थांनी सॅलरी स्ट्रक्चर आणि एग्रिमेंटवर नाराजी व्यक्त केली आहे.
कर्मचाऱ्यांकडून अनादर
वैमानिकांनी टाटांना लिहीलेल्या पत्रात एचआरची तक्रार केली असून एअर इंडियाचे कर्मचारी आदर आणि सन्मानाची वागणुक देत नाहीत, अशी नाराजीही व्यक्त केली आहे. मानसिक खच्चीकरण होत असल्याची भावना वैमानिकांनी मांडली आहे. या पत्रावर १ हजार ५०४ वैमानिकांनी स्वाक्षरी केली आहे.
Air India Pilots Letter to Tata Sons Ex Chairman Ratan Tata Complaint Demand