मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
तुर्की एअरलाइन्सचे माजी अध्यक्ष इल्कर आयसी यांची एअर इंडियाचे नवीन एमडी आणि सीईओ म्हणून टाटा सन्सने नियुक्ती केली आहे. इल्कर आयसी हे येत्या 1 एप्रिल पासून जबाबदारी स्वीकारतील. टाटा समूहाने गेल्या महिन्यात औपचारिकपणे एअर इंडियाचे नियंत्रण ताब्यात घेतले. टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टाटा सन्स कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत इल्कर आयसी यांच्या नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. इल्कर यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. चला सविस्तर जाणून घेऊया ते कोण आहेत आणि त्यांच्यासमोर आव्हाने काय आहेत.
इल्कर आयसी हे तुर्की व्यापारी आहेत. त्यांचा जन्म 1971 मध्ये इस्तंबूल येथे झाला. ते सन 1994 चे राज्यशास्त्र आणि सार्वजनिक प्रशासन विभाग, बिल्केंट विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आहेत. आयसी हे 1994 मध्ये तुर्कीचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोआन यांचे सल्लागार होते. याशिवाय 2015 ते 2022 पर्यंत त्यांनी तुर्की एअरलाइन्सचे अध्यक्ष म्हणून काम केले. इल्कर यांनी इस्तंबूल महानगरपालिकेतही अनेक पदे भूषवली आहेत. सन 2005 ते 2011 पर्यंत त्यांनी अनेक विमा कंपन्यांचे सीईओ म्हणूनही काम केले. जानेवारी 2011 मध्ये, त्यांची तुर्कीच्या पंतप्रधान मंत्रालयाच्या गुंतवणूक प्रोत्साहन संस्थेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
त्यांच्यापुढील आव्हाने
वर्षानुवर्षे तोट्यात असलेल्या एअर इंडियाची उशिराने धावते आणि त्याच वेळी खराब सेवा देते, अशी वाईट प्रतिमा आहे. सध्या, भारतीय विमान कंपनीत इंडिगोचा बाजारातील हिस्सा 57 टक्के आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एआयएसआयला टाटा समूहासोबत नवी रणनीती आखावी लागणार आहे. एअर इंडियासमोर सर्वात मोठे आव्हान आहे ते ग्रुपसाठी नवीन ‘व्हिजन, मिशन आणि स्ट्रॅटेजी’ तयार करणे होय, त्याचबरोबर, ‘एअर इंडिया’चा तोटा दूर करण्यासाठी आयसी यांच्या समोर आव्हान असेल. एअर इंडियामध्ये 2012 मध्ये सुमारे 27 हजार कर्मचारी होते, ज्यांची संख्या आता निम्मी म्हणजे 13,500 च्या आसपास आली आहे. नियुक्तीनंतर इल्कर आयसी म्हणाले की, मला आयकॉनिक एअरलाइन्सचे नेतृत्व करताना आणि टाटा समूहात सामील होताना आनंद होत आहे. आम्ही एअर इंडियाच्या मजबूत वारशाचा उपयोग करू आणि तिला जगातील सर्वोत्तम एअरलाइन बनवण्याचा प्रयत्न करू.
भविष्यात काय होणार?
– एअर इंडियाचे फ्लाइट ऑपरेशन अधिक चांगले होऊ शकते.
– प्रवाशांना भाड्यापासून जेवणापर्यंत चांगली सेवा मिळण्याची शक्यता.
– विमानाच्या आतील आणि बाहेरील ब्रँडिंगमध्ये बदल होणार आहे.
– टाटा समूह एअरलाइन व्यवसायाचे एका युनिटमध्ये विलीनीकरण करू शकतो.
टाटा समूहासमोर आव्हाने:
– एअर इंडिया गेल्या एक दशकापासून मोठ्या तोट्यात आहे.
– टाटा समूहाला विमान कंपनीचे २३ हजार कोटींहून अधिक कर्ज फेडायचे आहे.
– देशांतर्गत विमान वाहतूक बाजारात एअर इंडियाचा हिस्सा 11 टक्क्यांवर आला आहे.
– एअर इंडियाला कर्जमुक्त विमान कंपनी बनवणे.
– एव्हिएशन मार्केटमध्ये एअर इंडियाचा हिस्सा वाढवण्यासाठी.
– इंडिगो सध्या ४८ टक्के स्टेक असलेली सर्वात मोठी एअरलाइन आहे.