विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
आपल्या देशात विमानाने पहिल्यांदा प्रवास करणारा कोणताही व्यक्ती आधी सगळ्या देवांचा धावा करतो. प्रवास सुखरूप होऊ दे रे बाबा…असे साकडे घालत असतो. वर्हाड निघालंय लंडनला या एकपात्री नाटकातही वर्हाडकार लक्ष्मण देशपांडे यांनी पहिल्यांदा प्रवास करणार्या ग्रामीण भागातील वर्हाडाकडून देवाला साकडे घालण्याच्या प्रसंगाचे सुंदर आणि यथार्थ वर्णन केले आहे. पण समजा सगळ्या गोष्टी सुरळीत सुरू असतानाही एखादे विमान अचानक खाली उतरविण्याचा प्रसंग आला तर…
एअर इंडियाच्या एका विमानाने अशी आकाशी छेप घेतली अन् बघता बघता वैमानिकाला विमान पुन्हा खाली उतरावे लागले. झाले असे की, एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अचानक त्यामध्ये वटवाघुळाचे दर्शन झाले आणि एकच गोंधळ उडाला. वैमानिकाने त्वरित हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला याबाबत सूचना दिली. विमानाला अर्धा तासानंतर दिल्ली विमानतळावर उतरविण्यात आले. ही घटना गुरुवारी (२७ मे) रोजी घडली.
एअर इंडियाच्या विमानाने पहाटे २ वाजून २० मिनिटांनी न्यूयॉर्ककडे उड्डाण केले. विमानाला उड्डाण करून जवळपास अर्धा तास झाला असेल. त्यानंतर लगेचच विमानात एक वटवाघुळ दिसले. वैमानिकाने पुन्हा दिल्लीत परतण्याचा निर्णय घेतला.
AI-105 DEL-EWR विमान लोकल स्टँडबाय इमर्जन्सी घोषित करण्यात आल्यानंतर विमानाला उतरविण्यात आले. परतल्यानंतर कळाले की कॅबिन क्रू सदस्यांनी वटवाघुळाला पाहिले. त्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. विमानात धूर केल्यानंतर मेलेल्या वटवाघुळाला बाहेर काढण्यात आले, असे एअर इंडियाच्या अधिकार्यांनी सांगितले.