नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एअर इंडियाच्या नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या विमानात एका प्रवाशाला विंचू चावला आहे. मात्र, या घटनेत प्रवाशाचा जीव वाचला असून तो आता पूर्णपणे बरा आहे. एअर इंडियानेही या संदर्भात निवेदन जारी केले आहे. ही घटना २३ एप्रिल रोजी घडल्याचे सांगण्यात आले आहे. ज्याची आता अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
नागपूर-मुंबई फ्लाइटमध्ये एका महिला प्रवाशाला विंचू चावल्याचे वृत्त आहे. त्यानंतर प्रवाशाला तात्काळ वैद्यकीय मदत देण्यात आली आणि विमान उतरताच तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. “लँडिंग केल्यानंतर, प्रवाशाला विमानतळावरील डॉक्टरांनी ताबडतोब तपासले. आणि नंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. जेथे तिच्यावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला,” असे निवेदनात म्हटले आहे.
विमानातून हॉस्पिटलपर्यंत एअर इंडियाचे अधिकारी सतत प्रवाशासोबत होते आणि डिस्चार्ज होईपर्यंत त्यांनी तिची पूर्ण काळजी घेतली, असेही निवेदनात म्हटले आहे. एअर इंडियाने सांगितले की, या घटनेनंतर एअर इंडियाच्या इंजिनीअरिंग टीमने विमानाची तपासणी केली. टीमने सर्व प्रोटोकॉल पाळून विमानाचा शोध घेतला. अखेर विमानातून विंचू बाहेर काढला. यानंतर विमानाची स्वच्छता करण्यात आली. या घटनेबद्दल विमान कंपनीने प्रवाशाची माफीही मागितली आहे.
Air India Flight Passenger Scorpion Bite