इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अपघाताचं वृत्त कळल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्वरित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्याशी चर्चा केली आणि आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. राम मोहन नायडू यांनी थोड्याच वेळापूर्वी घटनास्थळाला भेट दिली आणि मदत तसंच बचाव कार्याचा आढावा घेतला. या घटनेची सखोल चौकशी केली जाणार असून दोषी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जाणार असल्याचं नायडू म्हणाले.
अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघात दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना टाटा समुहानं प्रत्येकी १ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींच्या उपचारांचा खर्चही समूह उचलणार असून बीजे महाविद्यालयाचं वसतीगृह देखील बांधून देणार आहे, अशी माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी दिली. १२ ते १४ जून दरम्यानच्या प्रवासाची तारिख बदलायची असेल किंवा रद्द करायची असेल तर कुठलंही शुल्क न आकारण्याचा निर्णय एअर इंडियानं जाहीर केला आहे.
२६५ जणांचा मृत्यू
अहमदाबाद विमानतळावरुन लंडनकडे उड्डाण केलेलं विमान अवघ्या काही मिनिटात अहमदाबाद विमानतळाच्या जवळ गुरुवारी दुपारी कोसळलं. या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून २४२ जण होते. त्यातील एक जण रमेश विश्वास कुमार सुदैवाने बचावले तर इतरांचा मृत्यू झाला. अहमदाबादमधलं बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतीगृह, कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या इमारतीवर हे विमान कोसळलं. यात २४ डॉक्टरांचा मृत्यू झाला. गृहमंत्री अमित शहा, गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या ५० जणांवर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती गुजरातचे आरोग्य सचिव धनंजय द्विवेदी यांनी दिली.
बोइंग ७८७ प्रकारचं हे विमान
बोइंग ७८७ प्रकारचं हे विमान होतं. त्यात १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटीश, ७ पोर्तुगालचे आणि १ कॅनडाचा नागरिक होता. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं या अपघातात निधन झालं. विमानातल्या कर्मचाऱ्यांमध्ये अपर्णा महाडीक, दीपक पाठक, मैथिली पाटील या महाराष्ट्रातल्या नागरिकांचा समावेश होता. दीवमध्ये राहणाऱ्या एका विमान प्रवाशाचा जीव या दुर्घटनेतून वाचला आहे.
वाहतूक काही काळासाठी स्थगित
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. एनडीआरएफ, CISF सह स्थानिक यंत्रणांनी घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे. लष्कराच्या १३० अधिकारी आणि जवानांची तुकड़ीही घटनास्थळी मदत कार्यात सहभागी झाली आहे. या अपघातामुळं अहमदाबाद विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी स्थगित केली होती.
हेल्पलाइन क्रमांक जाहीर
नागरिकांच्या मदतीसाठी हवाई वाहतूक मंत्रालय, एअर इंडिया, गुजरात सरकार यांनी हेल्पलाइन क्रमांक जाहीर केले आहेत. नागरिकांना ०७९-२३२-५१९००, ९९७८४०५३०४, ०११-२४६१०८४३ आणि ९६५०३९१८५९ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
एक बचावला
अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात होऊन २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशाचीही भेट घेतली.
१,००० हून अधिक डीएनए चाचण्या
डीएनए चाचण्या आणि ओळख पटल्यानंतरच मृतांची संख्या अधिकृतपणे जाहीर केली जाईल. गुजरात सरकारच्या सर्व विभागांनी मिळून बचाव कार्य केले.
विमानात असलेल्या १.२५ लाख टन इंधनामुळे कोणीही वाचवण्याची शक्यता नव्हती. मी घटनेच्या ठिकाणीही भेट दिली आहे. सर्वांना बाहेर काढण्याचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. डीएनए नमुने घेण्याची प्रक्रियाही लवकरच पूर्ण होईल. १,००० हून अधिक डीएनए चाचण्या कराव्या लागतील आणि त्या सर्व गुजरातमध्ये केल्या जातील असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
पायलटला इतका होता अनुभव
या विमानाच्या पायलटचे नाव कॅप्टन सुमित सभरवाल आहे. सुमित यांना ८२०० तास विमान उडवण्याचा अनुभव आहे. तसेच या विमानाच्या सह-वैमानिकाला ११०० तासांच्या उड्डाणाचा अनुभव होता. विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून उड्डाण केले. मात्र उड्डाण केल्यानंतर लगेचच ते विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले.