नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योजकांची प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ते लवकरच सोडविली जातील. नाशिक शहराला चांगलं हवामान लाभलं असून नाशिक हे मुंबई पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असेल तर त्याचा अभ्यास करून नाशिकमध्ये विकास करण्यात येऊन नाशिकची ओळख टिकविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक शहारातील डोंगरे वसतिगृह येथे नाशिक ‘आयमा इंडेक्स २०२२’ उदघाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सीमा हिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पाटील, एचएएलचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपेंदिव मैती, हिरा नंदानी ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर नारायण,रंजन ठाकरे, आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल, माजी अध्यक्ष वरूण तलवार, सेक्रेटरी ललित बुब, उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,मनीष रावल, सूर्यभान नाईकवाडे,सुदर्शन डोंगरे, सेक्रेटरी योगिता आहेर, गोविंद झा, राजेंद्र कोठावदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आयमा इंडेक्सच्या माध्यमातून ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी झाली आहे. या सर्व उद्योजकांचे स्वागत केले. नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून उद्योगांना आवश्यक असे वातावरण तयार केले. नाशिकमध्ये एचएएलच्या माध्यमातून ओझर येथे विमानतळ विकसित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाहिले उत्कृष्ट असे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. नाशिकच्या विमानतळावर पार्किंची सुविधा असल्याने याठिकाणी विमाने यावीत अशी मागणी आहे. मात्र पार्किंगसाठी दुसरीकडे पाठविली जात आहे. त्यासाठी आपला प्रयत्न कायम आहे. विमाने रिपेरिंगसाठी नाशिकला प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन नाशिकच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ते म्हणाले की, नाशिकला अतिशय चांगला हवामान लाभलं असून प्रदूषण कारी उद्योग शहराच्या बाहेर विकसित करण्यात यावे जेणेकरून नाशिक शहराचे हवामान टिकेल. मुंबई पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाले असून याठिकाणी आता महाराष्ट्रात मुंबई पुण्यानंतर आता नाशिक हे उद्योजकांसाठी महत्वाचे डेस्टिनेशन आहे. महाराष्ट्रात अधिक उद्योग यावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जाणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडी सरकार काम करत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रभाव संपला असून शासन विकास कामांचा बॅकलोक भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असू उद्योजकांनी देखील गेल्या दोन वर्षांचा बॅकलोक भरून काढावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाल यांनी केले. तर यावेळी आयमा इंडेक्सचे चेअरमन धनंजय बेळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.