नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाच राजधानीतही भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये २० डॉक्टरांसह ६४ आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना योद्धेच बाधित झाल्याने झपाट्याने लागण होणाऱ्यांवर उपचार कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राजधानी दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात ३७ डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. गेल्या दहा दिवसांत या सर्वांना कोरोना संसर्ग झालेला आढळला आहे. यापैकी बहुतेक आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, परंतु काही आरोग्य कर्मचार्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे, तर इतर कर्मचारी घरीच उपचार घेत आहेत. त्याच वेळी एम्स मधील ६४ आरोग्य कर्मचारी आणि २० एमबीबीएस प्रशिक्षणार्थी डॉक्टरांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.
नर्सिंग विभागामध्ये सर्वाधिक संक्रमित आरोग्य कर्मचारी आहेत. ३१ मार्च ते ८ एप्रिल दरम्यान एकूण ३८ नर्सिंग स्टाफच्या संसर्गाची माहिती दिली गेली आहे. दि. ६ एप्रिल रोजी नर्सिंग विभागाच्या १७ कर्मचार्यांमध्ये कोरोना संसर्गाची लागण झाली. तर शुक्रवारी मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर एम्सने ऑपरेशन थिएटरमध्ये नियमित शस्त्रक्रिया करण्यास मनाई केली असून याशिवाय कोविड नसलेल्या रूग्णांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, राजधानी दिल्लीत शुक्रवारी ८,५२१ नवीन कोरोनाची लागण झाली आहे. त्याचवेळी, कोरोनामुळे ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. यापूर्वी ११ नोव्हेंबर २०२० रोजी ८,५९३ प्रकरणे नोंदली गेली. गुरुवारी दिल्लीत दुसऱ्यांदा एक लाखाहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. दिल्लीत आतापर्यंत सुमारे ७ लाख ६ हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे, तर सुमारे ६ लाख ६८ हजार लोक कोरोनामधून बरे झाले आहेत. तसेच दिल्लीत कोरोनामुळे आतापर्यंत ११,१९६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.