अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी यापुढे जेईई मेन्स अनिवार्य राहणार नाही. ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) येत्या शैक्षणिक सत्रापासून दुसऱ्या वर्षापासून बी.टेक आणि बीई प्रोग्राममध्ये प्रवेशाची सुविधा सुरू करणार आहे. एआयसीटीईने यासाठी सर्व विद्यापीठे आणि राज्यांना पत्र लिहिले आहे.
एआयसीटीईचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांनी पाठवलेल्या पत्रानुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा धारक, बीएससी पदवी आणि या क्षेत्रातील व्होकेशनल डिप्लोमा असलेले विद्यार्थी अर्ज करू शकतात. बीटेक आणि बीईच्या द्वितीय वर्षाचे प्रवेश आता लॅटरल एन्ट्रीद्वारे करता येणार असल्याचे म्हटले आहे. एआयसीटीईने प्रवेश पात्रता आणि नियमही निश्चित केले आहेत. यामध्ये प्रवेशाची पात्रता तीन स्तरांवर निश्चित करण्यात आली आहे. येथे बी. टेक आणि बीई प्रोग्राम्सच्या प्रवेशासाठी, बॅचलर ऑफ व्होकेशनल हे डिप्लोमा इन इंजिनीअरिंग आणि बीएससीच्या समकक्ष मानले जाईल.
दोन किंवा तीन वर्षांचे डिप्लोमाधारक विद्यार्थी इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकतात. सर्वसाधारण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४५ टक्के आणि एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण असणे आवश्यक आहे. तसेच बीएससी पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण असण्याबरोबरच इयत्ता बारावीमध्ये गणित विषय असणे अनिवार्य आहे. यामध्येही एससी आणि एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० टक्के गुणांची असणे आवश्यक आहे.
इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञानातील व्यावसायिक डिप्लोमा असलेल्या विद्यार्थ्यांनाही लॅटरल एंट्रीद्वारे प्रवेश मिळेल. यामध्ये या विद्यार्थ्यांसाठी नंतर ब्रिज कोर्सेस घेण्याची व्यवस्था विद्यापीठांना करावी लागणार आहे. यामध्ये गणित, भौतिकशास्त्र, अभियांत्रिकी, रेखाचित्र इत्यादी विषयांवर विशेष कोचिंग किंवा तयारी केली जाईल जेणेकरुन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम अधिक चांगल्या प्रकारे समजेल.