अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट कॉलेजमधील विशेष विद्यार्थ्यांना अभ्यासात कोणतीही अडचण येणार नाही यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. टेक्निकल कॉलेजांमधील दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपी, ऑडिओ आणि डिजिटल मोडमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देत या उपाययोजना प्रत्यक्षात आणण्यात येणार आहे.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) म्हणजेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने टेक्निकल अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कॉलेजांमध्ये दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी पुस्तके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. कॉलेजांनी याची तपशीलवार माहिती एआयसीटीईला द्यायची आहे. AICTEच्या धोरण आणि शैक्षणिक नियोजन ब्युरोचे सल्लागार डॉ. रमेश उन्नीकृष्णन यांच्या वतीने सर्व राज्ये आणि कॉलेजांना पत्र लिहिले आहे.
टेक्निकल अभ्यासक्रम शिकवणाऱ्या कॉलेजांमध्ये सर्व दृष्टिहीन विद्यार्थ्यांना सामान्य विद्यार्थ्यांच्या धर्तीवर अभ्यासक्रमाचे साहित्य मिळणे आवश्यक असल्याचे यात लिहिले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी सर्व टेक्निकल कॉलेजांनी त्यांची पुस्तके उपलब्ध करून द्यावीत असेही सांगितले गेले आहे. या अभ्यासक्रमांतर्गत, ब्रेल लिपीत, ऑडिओ बुक्स, कॅपिटल अक्षरांमधील छापील पुस्तके आणि जे काही मजकूर साहित्य डिजिटल स्वरूपात उपलब्ध असेल, तर ते उपलब्ध करून देणे कॉलेजांना बंधनकारक असणार आहे.
भारतीय भाषांमध्ये पुस्तके
एआयसीटीई आपल्या टेक्निकल कॉलेजांना सामान्य विद्यार्थ्यांच्या धर्तीवर विशेष विद्यार्थ्यांना भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी करण्यास सांगितले आहे. सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. भारतातील सर्व मुख्य भाषांमध्ये ही पुस्तकं असणार आहेत.
मोफत पुस्तके
दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी पुस्तके मोफत उपलब्ध करून दिली जातील, असेही एआयसीटीईने तांत्रिक महाविद्यालयांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. जर तांत्रिक महाविद्यालयांना अभ्यासक्रमाच्या आधारे ब्रेल लिपीत, ऑडिओ बुक्स किंवा डिजिटल पद्धतीने तयार केलेली पुस्तके मिळत असतील, तर त्यांनी प्रकाशकांना त्यांची मोफत छपाई करून देण्याची विनंती करावी.