विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नवं राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झाल्यानंतर इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात मोठ्या बदलांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये आता १२ वीमध्ये फिजिक्स, केमेस्ट्री आणि मॅथ्स म्हणजेच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणिताचा अभ्यास केल्याशिवाय विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या काही निवडक विषयांमध्ये प्रवेश घेऊ शकणार आहेत. यामध्ये बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान), टेक्सटाइल (वस्त्रोद्योग) आणि एग्रीकल्चरल (शेती विषयक) इंजिनिअरिंगसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे. अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (एआयसीटीई)ने या सर्व बदलांच्या प्रस्तावांना मान्यता दिली आहे.
काही विशेष अभ्यासक्रमांसाठी पीसीएमची गरज नाही
या बदलांमुळे निर्माण झालेल्या वादावर अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद (एआयसीटीई) चे अध्यक्ष प्रा.अनिल डी. सहस्त्रबुद्धे म्हणाले, की फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित हे विषय इंजिनिअरिंगच्या अभ्यासात महत्त्वाचे आहेत. परंतु इंजिनिअरिंगच्या काही अभ्यासक्रमांसाठी हे विषय महत्त्वाचे नाहीत. त्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी, टेक्सटाइल, एग्रीकल्चरल इंजिनिअरिंगसारख्या विषयांचा समावेश आहे.
बदल अनिवार्य नाहीत
एआयसीटीईच्या शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठीच्या माहितीपुस्तकांच प्रकाशन करताना प्रा. सहस्त्रबुद्धे शुक्रवारी पत्रकारांशी ऑनलाइन संवाद साधत होते. या बदलांना अनिवार्य करण्यात आलं नसून याला एक पर्यायी व्यवस्था म्हणून ठेवण्यात आलं आहे. कोणत्याही राज्यांमधील अभियांत्रिकी महाविद्यालयांसाठी बंधनकारक करण्यात आलं नाही. ते पूर्वीसारखंच फिजिक्स, केमेस्ट्री, मॅथ्सच्या अभ्यासक्रमात प्रवेशप्रक्रिया सुरू ठेवू शकतात.
मातृभाषेत अभ्यासाला प्राध्यान्य
एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, की शैक्षणिक धोरणात सध्या मातृभाषेत अभ्यास करण्यास प्राधान्य देण्यात आलं आहे. तसंही जवळपास ४२ टक्के विद्यार्थी आपल्या मातृभाषेत इंजिनिअरिंगचा अभ्यास करू इच्छितात, असं एका सर्वेक्षणात आढळलं आहे. या विद्यार्थ्यांनी १२ वी पर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमात घेतलं तरीही ही परिस्थिती आहे. ते विद्यार्थी तामिळ, बांगला, मराठी भाषेत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊ इच्छितात.
केवळ इंग्रजी आवश्यक नाही
प्रा. सहस्त्रबुद्धे म्हणाले, की जर कोणी आपल्या मातृभाषेत इंजिनिअरिंगचा अभ्यास करू इच्छितो, तो त्या भाषेचा पर्याय निवडू शकतो. इंजिनिअरिंगचा अभ्यास फक्त इंग्रजी भाषेतच होतो असा समज आहे. परंतु तसं नाहीये, मातृभाषेतही इंजिनिअरिंगचा चांगला अभ्यास होऊ शकतो. आम्ही त्या दिशेनं काम करत आहोत. येत्या काही दिवसात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आणखी काही बदल करण्याच्या दृष्टीनं आम्ही मार्गक्रमण करणार आहोत, असंही ते म्हणाले.