शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखादा शिक्षण विभागाचा अधिकारी खेड्यातील शाळेला भेट देतो तेव्हा त्याच्याकडून सूचना, आदेश आणि नाराजीच अपेक्षित असते. त्याला शाळेतील काहीही आवडलेले नाही, असे स्पष्ट दिसत असते. मात्र राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी एका तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेला भेट दिल्यानंतर व्यक्त केलेली भावना संपूर्ण राज्यात सध्या चर्चेला आहे.
राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी या शाळेला भेट दिली. खरे तर शाळेचे स्वरुप बघता सर्वांनाच आयुक्त तक्रार करणार नाहीत, याची खात्री होती, पण कौतुक करतील, याचा त्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पानोली जिल्हा परिषद शाळेला आयुक्तांनी भेट दिली आणि तिथे त्यांना जे काही दिसले ते बघून त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त अशी प्रतिक्रिया निघाली.
शाळेतील डिजीटल क्लासरूम, गुणवत्तापूर्ण शिक्षण, भौतिक सुविधा, स्वच्छता बघून शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या तोंडून ‘अशी शाळा मी आजपर्यंत बघितलेली नाही’ अशी उत्स्फूप्त प्रतिक्रिया निघाली. त्यानंतर शाळेतील शिक्षक, व्यवस्थापन साऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होता. पानोली येथील जिल्हा परिषदेची शाळा सेमी इंग्रजी माध्यमाची आहे. याठिकाणी फ्युचरिस्टिक क्लासरूम तयार करण्यात आल्या असून या शाळेत केवळ ३० विद्यार्थी शिकतात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ टेक्नॉलॉजी इन टू एज्युकेशन हा विषय डिजीटल क्लासरूममध्ये शिकविला जातो.
टचस्क्रीन मॉनीटर
प्रत्येक मुलापुढे बेंचवर टचस्क्रीन मॉनिटर असून मुले त्यावर सगळा अभ्यास करतात. त्यांनी केलेला अभ्यास अर्थात वर्गपाठ त्यांना सेव्ह करून ठेवण्याची सोय देखील झाली आहे. अशी शाळा एका तालुक्याच्या ठिकाणी असणे आणि अतिशय नेटाने विद्यार्थ्यांना भविष्यातील शिक्षण देत राहणे कौतुकास पात्र ठरू नये तर नवल.
पानोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नेताजी सुभाष चंद्र बोस माध्यमिक विद्यालय येथे स्थापन करण्यात आलेल्या
फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरूमची वैशिष्ट्ये अशी…
• ३० विद्यार्थी क्षमतेची फ्युचरिस्टिक डिजिटल क्लासरुम.
• ‘ट्रान्सफॉर्मशेन ऑफ टेक्नोलॉजी इन टू एज्युकेशन’ या संकल्पनेवर आधारित अभ्यासक्रम.
• ‘टेक्नॉलॉजी एनहान्सड् लर्निग’ संकल्पना.
• मुलांच्या डिजीटल शिक्षण प्रगतीचे आॅनलाईन माॅनिटरींग.
• विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अॅक्टीव्हीटीचे डिजीटल पध्दतीने नियंत्रण.
• आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत. राज्यात चार ठिकाणी अशा प्रकारच्या क्लासरुमची सुरुवात.
Ahmednagar ZP School Future Digital Classroom Education
Commissioner Suraj Mandhare Parner Jilha Parishad Panoli