शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून धर्मांतरणाची प्रकरणे मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. विशेषत: महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून अशा प्रकारच्या घटना घडताना दिसताहेत. या पार्श्वभूमीवर अहमदनगरातील राहुरी येथील एका खासगी शिकवणी वर्गात मुलींचे धर्मांतरण करण्याचा प्रकार घडल्याची माहिती आहे. शिक्षकाने यासाठी दबाव आणल्याची माहिती असून या घटनेने वातवरण तापले आहे.
धर्मांतरण आणि लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्यात यावा, अशी मागणी होऊ लागली आहे. यासाठी हिंदुत्ववादी संघटना आग्रही आहेत. अशात धर्मांतरणाच्या वाढत्या घटनांनी या कायद्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे. अशातच राहुरी येथील घटनेने सामाजिक वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका होत आहे. प्राप्त माहितीनुसार, अहमदनगर राहुरी येथे शिक्षिकेकडून कोचिंग क्लासला येणाऱ्या अल्पवयीन मुलींवर धर्मांतरासाठी दबाव टाकला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी काही मुलींनी राहुरी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणातील कोचिंग क्लासच्या शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. प्रकरणाचा आधिक तपास सुरू असून आणखी कुणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचे राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनजंय जाधव यांनी सांगितले आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तिथल्या पोलिस अधिकाऱ्यावर देखील कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राधाकृष्ण विखे पाटलांच्या पोलिसांना सूचना
धर्मांतरण प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलिस प्रशासनाला दिले आहेत. राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. यापूर्वी श्रीरामपूरमध्ये घडलेल्या घटनांमध्ये डबल मोक्का लावण्यात आला असून लव जिहादच्या बाबतीत जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्त सूचना दिल्या आहेत.