अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या राजकारणात वेगवेगळ्या उलट सुलट चर्चा सुरू आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपमध्ये जाणार या चर्चेला प्रचंड उधाण आले आहे. त्यातच आता भाजपचे आमदार राम शिंदे यांनी आपण खासदारकीची निवडणूक लढविणार, अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार सुजय विखे यांचे काय होणार? याची चर्चा नगर जिल्ह्यात रंगली आहे.
कारण नगर जिल्हा म्हणजे जणू काही विखे पाटलांचा बालेकिल्लाच मानला जातो. त्यांची चौथी पिढी या राजकारणात आहे. त्यामुळे विखे पाटील हे कोणत्याही पक्षात असले तरी निवडून येतात, असे म्हटले जाते विखे पाटील कुटुंबातील सदस्यांनी आतापर्यंत काँग्रेस, शिवसेना आणि भाजप असा प्रवास केला आहे. परंतु आता भाजपमध्ये त्यांना शह देणारे राजकारण सुरू झाले की काय ? असे म्हटले जाते.
कारण राम शिंदे यांनी जर खासदारकीचे तिकीट मागितले तर त्यांना कदाचित ते मिळू शकते. कारण देवेंद्र फडणवीस यांचे ते अत्यंत निकटवर्तीय आणि जवळचे मानले जातात. साहजिकच विखे पाटलांनी यांच्या घराण्यात चलबिचल सुरू झाल्याचेही म्हटले जाते. विशेषतः सुजय विखे यांचे टेन्शन वाढले आहे, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या बद्दलही आपले मत व्यक्त केले आहे म्हणजे अजित पवारांविषयी मत व्यक्त करणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव सामील झाले आहे. गेल्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांचे वडील राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील काँग्रेसला करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते मंत्री देखील झाले होते. तसेच सुजय विखे पाटील या निवडणुकीत जिंकूनही आले. मात्र आता त्यांना पुन्हा भाजपकडून खासदारकीचे तिकीट मिळते का? दुसऱ्या कुणाला संधी मिळते याची चर्चा सुरू आहे. कारण आता राम शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे अहमदनगरमध्ये आता आगामी काळात भाजपमध्येत शीतयुद्ध रंगण्याची चिन्हे आहेत.
राम शिंदे म्हणाले की, मी मंत्री आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तेव्हाच अनेकांनी मी लोकसभेला उभे राहावे अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्यावेळेला मी कोणतीही भूमिका घेतली नाही. तर मी विधानसभा ही लढणार असलो तरी मी मनाची तयारी ठेवली आहे की लोकसभा ही लढवायची. मी पक्षाचा आदेश पाळणारा कार्यकर्ता असल्यामुळे यावेळी पूर्ण एक वर्ष आधीच लोकसभेसाठी तयारीत आहे.
राम शिंदे यांनी अजित पवार यांच्या भूमिकेवरही प्रतिक्रिया दिली.
विरोधी पक्षनेतेच गारद
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंजावाता इतका आहे की, त्यांच्या कालावधीत जो जो विरोधी पक्षनेता झाला तो त्यांच्या बरोबर आला. पहिले राधाकृष्ण विखे पाटील, नंतर एकनाथ शिंदे आले आणि आता अजित पवारांचा तिसरा नंबर, असेही राम शिंदे म्हणाले. अजित पवार भाजप मध्ये जाणार किंवा भाजपबरोबर जाणार हे सांगणाऱ्यांची यादी आता वाढतच चालली आहे.
Ahmednagar Politics Ram Shinde Loksabha Election