अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पाथर्डी मधील तिलोक जैन महाविद्यालयात ३ डिसेंबर २०२२ रोजी जातवैधता प्रमाणपत्र वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज स्विकारुन त्याच दिवशी वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ‘मंडणगड पॅटर्न’ च्या धर्तीवर हा उपक्रम राबविण्यात येत आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पाथर्डी येथील कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे हे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित सर्व विद्यार्थी- पालक यांच्याशी संवाद साधणार आहेत. यावेळी समितीचे अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी (निवडश्रेणी) विकास पानसरे, सदस्य तथा उपायुक्त श्रीमती अमीना शेख, सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी भागवत खरे हे समितीचे तिन्ही अधिकारी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह या शिबिरासाठी महाविद्यालयात उपस्थित राहणार आहेत.
समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या संकल्पनेतून ‘मंडणगड पॅटर्न’ जिल्हयात राबविण्यात येत आहे. यापूर्वी या समितीने नेवासा तालुक्यातील भेंडा फॅक्टरी येथील जिजामाता माध्यमिक विद्यालय व राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात एकदिवसीय शिबिराचे आयोजन करून त्याच दिवशी इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या २०१ विद्यार्थ्यांना ‘जातवैधता प्रमाणपत्रांचे’ वाटप केलेले आहे. पाथर्डी येथे होणाऱ्या शिबिराचा तालुक्यातील सर्व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, पालक, प्राचार्य व कर्मचारी यांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही श्री. पानसरे यांनी केले आहे.
Ahmednagar Pathardi College Student Certificate Special Camp
Caste Validity On The Spot