मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे कालव्याचे काम डिसेंबर २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल यासाठी जलसंपदा विभागाने प्रयत्न करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. निळवंडे कालव्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे काम ८५ टक्के तर उजव्या कालव्याचे काम ७२ टक्के पूर्ण झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. डिसेंबर अखेरपर्यंत या दोन्ही कालव्याचे काम पूर्ण करून या भागातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे. यासाठीचे जास्तीचे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सुमारे ८३ गावातील नागरिकांना पाण्याचा लाभ होणार असल्याचे खासदार श्री. लोखंडे यांनी सांगितले.
अकोले तालुक्यातील घाटमाथ्यावर पडणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासंदर्भात पाहणी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. डॉ. साईनाथ आहेर यांनी यासंदर्भात सादरीकरण केले. यावेळी शेती महामंडळाच्या जमिनी बाबत तसेच श्रीरामपूर तालुक्यातील आकार पडीत जमिनीबाबत चर्चा करण्यात आली.
Ahmednagar Nilvande Canal Work CM Meet