शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात नव उद्योग आणि नव रोजगार निर्मितीच्या दृष्टिने नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याच अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यासाठी नव्या दोन नवीन एमआयडीसींना तत्त्वत: मंजुरी मिळाली असून भविष्यात नगरमध्ये रोजगार निर्मितीत वाढ होऊन तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार असल्याची माहिती राज्याचे महसूल, पशूसर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, महसूल विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाची महत्त्वाची बैठक आज सह्यादी अतिथीगृह येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूल, पशूसर्वधन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी हि माहिती दिली. या बैठकीस खा.डॉ सुजय विखे पाटील महसूल विभाग, उद्योग विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि शेती महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्राने ‘एक ट्रीलियन’ डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठणे आवश्यक आहे, त्याच दृष्टीने राज्यात नवे उद्योग आणि नव रोजगार निर्मिती झाली पाहिजे असा आमचा मानस आहे. देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून नव रोजगार निर्मितीच्या दृष्टिने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. अहमदनगर जिल्ह्याचा विकास होण्यासाठी नवीन उद्योगास चालना मिळावी, बेरोजगारांच्या हातांना काम मिळावे, तसेच गावातील स्थानिकांची स्थलांतर रोखण्यासाठी आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे नगर जिल्ह्यातील विस्तारित एमआयडीसीच्या संदर्भात मागणी केली होती. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यासाठी वडगाव गुप्ता, विळद येथे ६०० एकरावर फेज २ व शिर्डी येथे साईबाबा शिर्डी एमआयडीसीअशी ५०० एकरावर दुसरी एमआयडीसींना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तत्त्वत: मंजुरी दिल्याची माहिती विखे पाटील दिली.
शासनाच्या जमिनीवरती भूसंपादनाविना विकसित करण्यात येणारी ही राज्यातील पहिलीच एमआयडीसी असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले, तसेच या बैठकीत जुन्या एमआयडीसीच्या संदर्भातील निंबळक एमआयडीसी येथील समांतर रस्त्याला, सूपा एमआयडीसीला ५० कोटींचे अद्यावत असे अग्नीशमन ( फायर) स्टेशन, तसेच अंतर्गत रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. तसेच इतर विविध विषयांवर सकारात्मक पार पडल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
नगर जिल्ह्याचा विकास आराखडा तयार करताना रोजगार निर्मिती करण्याच्या उद्दीष्टाला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे औद्योगिक वसाहती उभारणीचे टाकलेले पाउल त्यादृष्टीने महत्वपूर्ण ठरणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
Ahmednagar District Two New MIDC Sanction Industry