शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिर्डी येथील बँक शाखेच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रगतीमध्ये अधिक भर पडेल, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को-ऑप बँकेच्या शिर्डी शाखेच्या नूतन इमारतीचे उदघाटन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर ग्रामविकास व पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राहुल कुल, आमदार जयकुमार गोरे,माजी आमदार तथा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, बँकेचे संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील, अंबादास पिसाळ, भानुदास मूरकुटे, विवेक कोल्हे पाटील आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळख असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुसज्ज व सर्व सोईनियुक्त अशी इमारत शिर्डी येथे उभारण्यात आली आहे. या शाखेतून जिल्हा बँकेच्या प्रगतीमध्ये भर पडेल अशा पद्धतीने उल्लेखनीय असे काम व्हावे. पशुधनाचे संगोपन अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे. तसेच राज्य, परराज्यातील विविध प्रजातीच्या पशुधनाची माहिती होऊन पशुपालकांच्या उत्पन्नात अधिक भर पडण्याच्यादृष्टीने आयोजित पशुधन महाएक्सपो 2023 शेतकरी व पशुपालकांसाठी पर्वणी ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती – मंत्री गिरिष महाजन
ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन म्हणाले, सहकाराच्या माध्यमातून शेतकरी उन्नत होत असतो. शेती, सहकार, दुग्धव्यवसायामध्ये अहमदनगर जिल्हा अग्रेसर असून 9 हजार कोटी रुपयांच्या ठेवी असलेली अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँक ही आशिया खंडातील अग्रेसर अशी बँक आहे. या बँकेतून शेतकरी पर्यायाने तालुका व जिल्हा अधिक समृद्ध व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार तथा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डीले, संचालक अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रावसाहेब वरपे यांनी केले. सर्वप्रथम फीत कापून व कोनशिला अनावरण करून नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमास बँकेचे पदाधिकारी, अधिकारी, महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Ahmednagar District Cooperative Bank Branch Shirdi Started