अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील आगडगाव येथे एकाचवेळी ६०० जावयांचे सामूहिक धोंडेजेवण आयोजित करण्यात आले. अधिक महिन्यात जावयाला भोजन आणि दान देण्याची परंपरा आहे. त्यानुसार, सर्वत्र ही प्रथा पाळण्यात येत असून आगडगावातील काळभैरवनाथ देवस्थानने पुढाकार घेत सामूहिक धोंडेजेवणाचा अनोखा उपक्रम राबविला आहे.
महाराष्ट्रात अधिक मासाला धोंड्याचा महिना या नावाने ओळखलं जातं. हिंदू धर्मात अधिकमास अतिशय पवित्र मानला जातो. नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी हा महिना सर्वाधिक खास असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा महिना म्हणजे जावयालाचे लाड करणाचा महिना असतो. या महिन्यात सासुरवाशीणीचे आई वडील जावयला घरी बोलवून त्यांना रितसर गंध वगैरे लावून ओवाळतात. पंचपक्वाने त्यांचा मानपान केला जातो. जावयाला अधिकमासाचे वाण दिले जाते. हिंदू धर्मात मुलगी-जावयाला लक्ष्मीनारायणाचा जोडा मानतात. म्हणून जावयाला तुपात तळलेले तेहतीसच्या पटीत अनारसे देतात.
एका चांदीच्या अथवा तांब्याच्या ताम्हणात अनारसे ठेवून त्यावर तांब्याचा दिवा ठेवून तो लावून जावयाला देतात. अनारसे ऐवजी बत्तासे, म्हैसूरपाक, वगैरे जाळीदार पदार्थ द्यावयाचे असतात, यांची संख्या ३३ असावी. या महिन्यात नारळ, सुपाऱ्या, फळे यांसारख्या वस्तू सुद्धा तेहतीसच्या पटीत घेऊन दान करतात. अनेकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांच्यावर बोझा पडतो. अशात आगडगावातील काळभैरवनाथ देवस्थानने पुढाकार घेत गावातील ६०० जावयांचे सामूहिक धोंडेजेवण आयोजित करून आगळावेगळा आदर्श आखून दिला आहे.
साडेसात हजार किलो पुरण
सामूहिक धोंडेजेवणासाठी साडेसात हजार किलोचे पुरण तसेच भात, आमटी आणि धोंडे तयार करण्यात आले होते. स्वयंपाक तयार करण्यासाठी आगडगाव, देवगाव, जेऊर या आसपासच्या गावातील महिलांनी मदत केली. या धोंडे जेवणात सर्व जावयांना आणि लेकींना देवस्थानच्यावतीने कपडे, साडी आणि दहा ग्रॅम चांदीचे नाणे देण्यात आले. सुरुवातीला सर्व जावयांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर सर्व जोडप्यांनी मंदिराला सामूहिक प्रदक्षिणा घातली. १८ ते २० हजार भाविकांनी या धोंडे जेवणाच्या महाप्रसादाचा लाभ घेतला.
Ahmednagar District Agadgav 600 Javai Dhonde Jevan
Adhik Mas Van tradition culture daughter in law