अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये शहरासह जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीच्या घटना मध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच एका इसमाची निर्घृण हत्या झाल्याची घटना घडली असून तीन अल्पवयीन मुलांनी डोक्यात कुऱ्हाड घालून या इसमाची हत्या केली. या घटनेमुळे नगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सुपा पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. हत्या करणाऱ्या तिन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. विशेष म्हणजे दोन कुटुंबातील वैरांमधून हा प्रकार घडला आहे
कुटुंबात नेहमीच वाद
नारायणगव्हाण येथे हत्या झालेले संतोष गायकवाड यांच्या मुलीवर सिद्धांत भगवान दरेकर या तरुणाचे एकतर्फी प्रेम होते. या प्रेमातून गायकवाड आणि दरेकर कटुंबामध्ये वाद झाले होते. संतोष यांच्या मुलीकडून प्रतिसाद मिळत नसल्याने सिद्धांत दरेकरने गळाफास लावून आत्महत्या केली होती. तेव्हापासून दरेकर कुटुंब आणि गायकवाड कुटुंबात नेहमीच वाद होत होते. याच कारणातून गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरेकर कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांनी संतोष गायकवाड यांची हत्या केली. अत्यंत भयानक प्रकार म्हणजे डोक्यामध्ये कुऱ्हाड घालून संतोष यांची जागीच हत्या करण्यात आली होती.
सहा जणांविरोधात गुन्हा
आपल्या पतीची कोणी हत्या केली याचा अंदाज आल्याने याबाबत संतोष यांच्या पत्नीने काही जणांवर संशय घेतला होता, त्यानंतर याप्रकरणी संतोष यांची पत्नी सुरेखा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुपा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु अधिक चौकशी केली असता पोलिसांनी या तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या खूनाच्या मागे कोणीतरी वडीलधारी व्यक्ती असावी, असा पोलिसांचा आणि फिर्यादीचा संशय आहे. त्यामुळे तिन्ही अल्पवयीन मुलांसह खून करण्यास भाग पाडणाऱ्या भगवान नाना दरेकर, अजिंक्यतारा दरेकर, विष्णु नाना दरेकर, नारायण दरेकर, सोमनाथ दरेकर, हनुमंत दरेकर यांच्याविरोधात सूपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही मुलांमागे त्यांच्या कुटुंबातील सदस्य कारणीभूत असल्याने त्या आरोपींना अटक करावी, अशी मागणी संतोष गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणाचा अधिक चौकशी करत आहेत.