अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी आज अतिशय महत्त्वपूर्ण आदेश काढले आहेत. त्यानुसार, जिल्ह्यात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल-निनो या समुद्र प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने कालावधीत जनावरांसाठी चा-याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात मागील वर्षीच्या पेरणी अहवालानुसार 1 एप्रिल 2023 पासून 3041022 में टन चारा शिल्लक असून तो अंदाजे 3.8 महिने पुरेल. चा-याची उपलब्धता पाहता भविष्यात टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हादंडाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत अहमदनगर जिल्हयात उत्पादित होणारा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) यांची इतर जिल्ह्यात वाहतुक करण्यास मनाई आदेश जारी केला असुन हा आदेश पुढील दोन महिन्याच्या कालावधीकरीता लागू राहणार आहे.