मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
मराठवाड्यातील परळी वैद्यनाथ ते पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर या सुमारे पावणेतीनशे किलोमीटर अंतरापैकी आष्टी-नगर या सुमारे ६६ किलोमीटर अंतराच्या रेल्वेमार्गाचे उदघाटन आज करण्यात आले. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मार्गावर पहिली पॅसेंजर रेल्वे गाडी धावली आहे. यावेली विविध मान्यवर उपस्थित होते. या मार्गामुळे अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा पूर्ण झाली आहे.
सुमारे ३० वर्षाच्या प्रतिक्षेनंतर साकारलेला अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्ग हा मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. सध्याचा तयार झालेला रेल्वेमार्ग हा रेल्वेमार्ग अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ रेल्वे प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी निम्मा निम्मा खर्चाचा वाटा उचलाला आहे.
यांचा पाठपुरावा
जुन्या पिढीतील जाणकार सांगतात की , मराठवाड्यातील रेल्वेमार्गाबद्दल पहिली घोषणा तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी १९७२ साली कळंब येथील जाहीरसभेत केली होती. त्यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी गोविंदभाई श्रॉफ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाडा जनता विकास परिषदेने अर्ज , निवेदने व शिष्टमंडळांच्या माध्यमातून वेळोवेळी केलेला पाठपुरावा केला. त्यांनी केलेल्या अनेक रेल्वे संदर्भातील मागण्यांपैकी औरंगाबाद – मनमाड या रेल्वेमार्गाच्या रुंदीकरणाची मागणी अखेर सुमारे ३५ वर्ष पाठपूरावा करून सुमारे २० वर्षापूर्वी पूर्ण झाली. आता या मागणी पैकीच एक असलेल्या रेल्वे मार्ग आज कार्यन्वित झाला आहे. या रेल्वेचा सर्वात मोठा फायदा नगर आणि बीड या दोन जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.
मुंडे यांचे योगदान
मराठवाड्यातील या नव्या रेल्वेमुळे आष्टी-नगर पट्ट्यातील प्रवाशांना आणि नागरिकांना फायदा होईल. तसेच स्थानिक व्यापार आणि उद्योगांनाही चालना मिळणार आहे. विशेषतः मागास समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला या रेल्वेमुळे गती येणार आहे. नगर-बीड-परळी रेल्वे मार्ग हा विषय कायम बीड जिल्ह्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे. विशेष म्हणजे भाजपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांनी नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासंदर्भात कायम केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना बीडच्या रेल्वेमार्गासाठी अर्धा निधी राज्य सरकार देणार असल्याची घोषणा केली होती. या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निम्मी निम्मी तरतूद झालेली आहे.
दोनदा उदघाटन आणि…
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे सन १९९५ ते २००० या कालावधीत बीड रेल्वे स्थानकाचे दोनवेळा भूमिपूजन झाले होते. एकदा तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश कलमाडी आणि दुसऱ्यांदा पुन्हा पुढचे त्यावेळचे रेल्वे मंत्री राम विलास पास्वान यांच्या हस्ते झाले होते. परंतु त्यानंतर सुमारे २० वर्ष हा रेल्वे मार्ग धुळीत नव्हे तर गाजर गवतात झाकून गेला होता, इतका दुर्लक्षित झाला की, बीड जिल्ह्यातील जनता बीड शहरात रेल्वे स्थानक आहे, हे देखील विसरून गेली होती. आता नगरहून सुटणारी रेल्वे आष्टीपर्यंत तर आली बीडला कधी येईल याची सर्वांना प्रतीक्षा आहे. वेळोवेळी केंद्रीय अर्थसंकल्पात आणि रेल्वे बजेटमध्ये परळी बीड नगर या रेल्वे मार्गासाठी वारंवार निधीची घोषणा झाली होती, परंतु प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी होत नव्हती, परंतु अखेर आता या रेल्वे मार्गाला मुहूर्त लागला असून सुमारे ३० टक्के काम मार्गी लागले आहे. अहमदनगर-परळी रेल्वे मार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर आहे. नगरपासून आष्टीपर्यंत ६७ किलोमीटर अंतराचे काम पूर्णही झाले आहे. या रेल्वेची चाचणी पूर्ण झाल्यामुळे प्रत्यक्षात प्रवासी रेल्वे कधी सुरू होणार याकडे जनतेचे लक्ष लागले होते.
या स्थानकावर थांबणार
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न रखडला होता. रेल्वेमुळे औद्योगिक वसाहती निर्माण होण्यात मोठ्या अडचणी होत्या. शिवाय बीड जिल्ह्यात उत्पादित झालेला शेतमाल किंवा इतर कच्चामाल परराज्यात किंवा परजिल्ह्यात नेण्यासाठी रेल्वे नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. आता नगर ते आष्टी या दरम्यान पॅसेंजर रेल्वेगाडी सहा ठिकाणी प्रवाशांसाठी थांबणार आहे. यामध्ये नारायणडोह, लोणी, सोलापूर वाडी, धानोरा, कडा आणि आष्टी या रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. आष्टी तालुक्यातील पाच आणि नगर जिल्ह्यातील एक स्थानकावर लवकरच तिकीट विक्री केंद्र सुरू झाले असून या भागातील जनतेचा प्रवास सुखकर होणार आहे.
या वेळेत मिळेल सेवा
रविवार सोडून सोमवार ते शनिवार असे सहा दिवस अहमदनगर ते आष्टी ही डेमू ट्रेन धावणार आहे. नगरहून सकाळी ७.४५ वाजता ही ट्रेन सुटेल. आष्टी येथे सकाळी १०.३० वाजता पोहचेल. तर, सकाळी ११ वाजता ही ट्रेन आष्टीवरून निघेल आणि दुपारी१.५५ वाजता नगरला पोहोचेल. कडा, नवीन धानोरा, सोलापूरवाडी, नवीन लोणी आणि नारायणडोह या स्थानकांवर ही गाडी थांबेल.
यांना फायदा
विशेषतः या नव्या रेल्वे मार्गामुळे बीड जिल्ह्यातील ४ तालुक्यातील नागरिकांना पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी जाण्यासाठी या रेल्वेचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच व्यापारी वर्ग आणि शेतकरी यांना मुंबई, पुणे, दिल्ली, इंदोर, गुजरात, सुरत इत्यादी ठिकाणाहून शेतमाल तसेच अन्य सामान व कच्चा माल आणण्यास या रेल्वे गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे यामुळे उद्योगधंद्यास चालना मिळून रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
https://twitter.com/raosahebdanve/status/1573198867059052544?s=20&t=g94I8K3LhoPVOiUmLqYZFw
Ahmednagar Ashti New Railway Line Inauguration
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/