अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – खरीप हंगाम सन २०२३- २४ साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता, तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. १५ भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी उदभवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हास्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षांची जबाबदारी जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक गजानन घुले (मो.क्र.९४०४३२४१९६) मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे (मो.क्र.७५८८१७८८४२) यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. तालुका स्तरावर पंचायत समिती कार्यालयामध्ये निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्ष व समिती स्थापना करण्यात आलेली आहे. तालुका कृषी अधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत.
शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठांची उपलब्धता व्हावी, कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्हयामध्ये कार्यरत करणेत आलेली असून भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बोगस निविष्ठा व जादा दराने निविष्ठांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावेत. बियाणे खरेदी करताना पक्की पावती घेण्यात यावी. खरेदी पावतीवरील लॉट नंबर व बियाण्याच्या बॅगवरील टॅग व लॉट नंबर पडताळून पहावे. बियाणे बॅग फोडताना वरील बाजूचा टॅग बॅगेला तसाच राहावा यासाठी खालच्या बाजूने फोडावी. बियाणे उगवणी संदर्भात काही तक्रार उदभवल्यास तक्रार निवारण समितीकडे तक्रार दाखल करणे सोईचे होण्यासाठी बियाणेची फोडलेली पिशवी टॅगसहीत पिकाची काढणी होईपर्यंत जपून ठेवावी. किटकनाशके किंवा तणनाशके खरेदी करताना त्यांची अंतीम मुदत तपासून घ्यावी. अधिकृत विक्री केंद्रांमधूनच खते खरेदी करावीत. फिरत्या वाहनांमधून खतांची विक्री होत असल्यास त्वरीत तक्रार निवारण कक्षाशी संपर्क साधावा. कोणताही विक्रेता निविष्ठा खरेदी करताना इतर निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती करत असल्यास तात्काळ जवळचे कृषी कार्यालयामध्ये तक्रार दाखल करावी.
खरीप हंगामामध्ये गुणनियंत्रण विभागामार्फत विक्री केंद्रांची अचानक तपासणी केली जाणार आहे. संशयास्पद असणाऱ्या निविष्ठांचे नमूने तपासणीसाठी काढले जाणार आहेत. खतांचा ई-पॉस साठा व प्रत्यक्षातील साठा तपासला जाणार आहे. तरी निविष्ठा विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या बोगस निविष्ठांची विक्री करु नये. कोणतेही शेतकऱ्यांच्या हितास बाधा आणणारे बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही. अशा बाबी निदर्शनास आल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
जिल्हयामध्ये सर्व प्रकारच्या निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहेत. कोणत्याही शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. निविष्ठा उपलब्धतेत अडचणी उदभवल्यास शेतकऱ्यांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष किंवा कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील ०२४१ – २३५३६९३ किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील ०२४१-२४३०७९२ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.
Ahmednagar Agriculture 15 Flying Squads Control Room