अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्हा परिषद, कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने ‘साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा, कृषी व पशु प्रदर्शन महोत्सव’ न्यू ऑटर्स, कॉमर्स महाविद्यालयाच्या मैदानावर भरविण्यात आला आहे. या महोत्सवास शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि अहमदनगरकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
महसूल, पशुसंवर्धन व दूग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते १० फेब्रुवारी २०२३ रोजी या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या प्रदर्शनामध्ये कृषी विभागाचे आत्मा अंतर्गत गट शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी निविष्ठाचे २०० स्टॉल उभारले आहेत. ट्रॅक्टर व औजारे यांचे २० स्टॉल उभारण्यात आले आहेत. साईज्योती स्वयंसहाय्यता महिला बचतगटांचे २०० व विविध ग्रामीण खाद्य पदार्थाचे ९५ स्टॉल उभारण्यात आले आहेत. पशुसवंर्धन विभागाचे विविध जातीचे पशु-पक्षी, चारा पिकांचे प्रदर्शन ही भरविण्यात आले आहे.
महोत्सवातील आकर्षणाचे केंद्रबिंदू
पशुसवंर्धन विभागाच्या हरियाणा येथील दारा रेडा व २.८ फुट उंचीची कुंगनुर गाय हे महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. देवणी, खिलार, गीर, लालकंदारी, जर्सी, डांगी, या गायीच्या प्रजाती तसेच आफ्रिकन बोर, सिरोही, बिटल, बारबेरी, उस्मानाबादी, संगमनेरी या शेळयांच्या प्रजाती व टर्की, कडकनाथ, पाथर्डी गावराण कोंबडी या पक्षाच्या प्रजाती व मारवाडी घोडा यांनी महोत्सवात भाग घेतलेला आहे. कृषी विभागाचे पाणलोट मॉडेल, फळाचे पिरॅमिड व ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणारे मॉडेल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत.
पौष्टीक तृणधान्याचा वापर करुन बनविलेला शेतकरी मॉडेल, रांगोळी, शेततळे, शेततळे अस्तरीकरण, सोलर पंप, ऊस पाचट व्यवस्थापन, शेडनेट, हरितगृह, कांदा चाळ मॉडेल या बरोबर उंडे नर्सरी, राईन अॅण्ड शाईन नर्सरी, पानसरे नर्सरी अॅपॅक्य नर्सरी यांनी शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. महोत्सवातील व्याख्याने, कला व सांस्कृतिक कार्यक्रमाने गर्दीचा उच्चांक गाठला आहे. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी या महोत्सवाचा समारोप आहे. महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केले आहे.
Ahmednagar Agri Expo Attraction Animals