अहमदनगर – येथील जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला (आयसीयु) लागल्याची घटना घडली आहे. शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या भीषण आगीत १० कोरोना बाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर ७ जण गंभीर भाजले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. या आयसीयुमध्ये २० रुग्ण उपचार घेत होते.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक बंबांसह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. मात्र, आगीचे स्वरुप भीषण आहे. आगीचे लोळ खिडकी आणि दरवाजातून बाहेर येताना दिसत आहेत. अद्याप अधिकृत काहीही माहिती देण्यात आलेली नाही. अचानक लागलेल्या या आगीमुळे एकच गोंधळ उडाला. उपचार घेत असलेले अनेक रुग्णांना बेडवर हलणेही शक्य नव्हते. त्यामुळे या रुग्णांचा होरपळून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आगीची घटना कळताच रुग्णालयातील नर्स व कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना अन्यत्र हालविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, पाहता पाहता आगीने रौद्र रुप धारण केले. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री हसन मुश्रीफ हे कोल्हापूरहून नगरकडे रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी करुन चौकशीचे आदेश देण्यात येतील. तसेच, जखमी आणि मृतांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.