अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…
अहिल्यानगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील सावळीविहिर ते विळद घाट या दरम्यानच्या सुमारे ७५ कि.मी. लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण व दुरुस्तीचे काम १२ सप्टेंबर २०२५ पासून सुरू आहे. या काळात वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मोटार वाहन अधिनियम, १९८८ चे कलम ११५ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करून १२ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर २०२५ या कालावधीत या मार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.
अहिल्यानगरहून मनमाडकडे जाणाऱ्या वाहतुकीतील एक लेन अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे अहिल्यानगरहून मनमाडकडे जाणारी अवजड वाहतूक विळद सर्कल – शेंडी बायपास – नेवासा – गंगापूर – वैजापूरमार्गे मनमाड या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
तसेच अहिल्यानगरहून संगमनेर व नाशिककडे जाणारी सर्व अवजड वाहतूक कल्याण बायपास – आळेफाटा – संगमनेर या मार्गाने वळविण्यात आली आहे.








