अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणेंने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात. नागरिकांना कोवीड-१९ नियमांचे पालन करण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला केल्या आहेत.
राज्यातील कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर घ्यावयाच्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पूर्व तयारीसाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिका-यांनी अधिका-यांना सूचना दिल्या. यावेळी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी (नगरपरिषद/ नगरपंचायत) , वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय) व तालुका आरोग्य अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप निचित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री.भोसले म्हणाले, राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. आज जरी अहमदनगर जिल्ह्याची हाताच्या बोटावर मोजण्याऐवढी रूग्ण संख्या असली तरी ही रूग्णसंख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. तेव्हा प्रशासनाने सतर्क होत, संभाव्य वाढत्यास कोरोना रूग्णसंख्येला अटकाव करण्यासाठी वेळेत उपाययोजना कराव्यात. दररोज किमान ७०० कोरोना तपासण्या करण्यात याव्यात. यातील ६० टक्के आरटीपीसीआर व ४० टक्के रॅपिड अँटीजेन तपासण्या कराव्यात.
सर्व विभाग व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अधिनस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा घ्यावा. दररोज कोवीड विषयक केलेल्या कामकाजाचा अहवाल पोर्टलवर अद्यावत करावा. सर्दी, ताप व कोरोना सदृश्य लक्षण असणाऱ्या व्यक्तींची तात्काळ तपासणी करावी. तसेच सामाजिक अंतर, मुखपट्टीचा वापर, व हात धुण्यासाठी साबन किंवा सॅनिटायझरचा नियमित वापर या कोवीड प्रतिबंधात्मक वर्तनाचा वापर नागरिकांकडून नियमित व्हावा. यासाठी प्रशासनाने पुन:श्च जाणीवजागृती करावी. अशा सूचना ही जिल्हाधिकारी श्री.भोसले यांनी यावेळी दिल्या.
कोवीड लसीकरणाबाबत नागरिकांना आवाहन करतांना जिल्हाधिकारी श्री.भोसले म्हणाले, १२ वर्षापुढील सर्व बालकांनी कोवीडची दुसरी मात्रा घ्यावी. तसेच ६० वर्षापुढील सर्व व्यक्तींनी वर्धकमात्र घ्यावी. कोवीडची वाढती रूग्णसंख्या लक्षता घेता. सर्व नागरिकांनी लवकरात लवकर कोवीड लस घ्यावी व कोवीड निमांचे पालक करावे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मुखपट्टी (मास्कचा) चा वापर करावा.