अहमदनगर – जिल्ह्यातील एका शाळेतील १९ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता याच शाळेतील आणखी ३३ विद्यार्थ्यांची कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच एका शिक्षकालाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे बाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या ५३ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील १९ विद्यार्थी कोरोना बाधित झाल्याची बाब दोन दिवसांसमोर आली होती. त्याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. या विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात कठोर निर्णय लागू करण्यात आले आहेत. लस नाही तर प्रवेश नाही या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले असतील त्यांनाच विविध ठिकाणी प्रवेश दिला जात आहे.
आता याच शाळेतील आणखी ३३ विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे समोर आले आहे. तसेच, एका शिक्षकाचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासन अतिशय सतर्क झाले आहे. शाळेचा परिसर सील करण्यात आला आहे. बाधितांवर तातडीने उपचार सुरू झाले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यांना वसतीगृहातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाचे गांभिर्य ओळखत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे थोड्याच वेळात शाळेच्या परिसरात दाखल होणार आहेत. तेथील सद्यस्थितीची माहिती तसेच, उपाययोजनांचा ते आढावा घेणार आहेत.