इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अहमदाबाद येथे २००८मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अहमदाबाद विशेष न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या तब्बल ३८ जणांना फाशीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. एकाचवेळी इतक्या जणांना फाशीची शिक्षा सुनावण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. न्यायालयाने एकूण ४९ आरोपींना दोषी ठरवले होते.
अहमदाबाद हे २६ जुलै २००८ रोजी साखळी बॉम्बस्फोटांमुळे अक्षरशः हादरले होते. एकामागोमाग एक असे तब्बल २० बॉम्बस्फोट विविध ठिकाणी झाले. केवळ एक तासातच हे बॉम्बस्फोट घडविण्यात आले. अतिरेक्यांनी बॉम्ब हे टिफीनमध्ये ठेवले. हे टिफीन सायकलला अडकविण्यात आले. याच सायकल शहराच्या विविध भागात आणि खासकरुन गर्दीच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या. हे स्फोट इंडियन मुजाहिद्दीन आणि स्टुंडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी)चे दहशतवादी यांनी घडवून आणले होते. याप्रकरणी पोलिसांनी कसून तपास केला. तब्बल ९ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यात ६ हजार पाने ही पुराव्यांची होती. या खटल्यामध्ये १ हजार ११७ साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले. सर्वसाक्षी आणि पुरावे यांची पडताळणी केल्यानंतर तब्बल १३ वर्षांनी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला आहे. या खटल्याच्या दरम्यान ९ न्यायाधीशांची बदली झाली. त्यामुळेही हा खटला अधिक काळ चालला आहे. विशेष न्यायालयाने एकूण ७७ आरोपींपैकी २८ जणांना निर्दोष घोषित केले. १ आरोपी माफीचा साक्षीदार झाला. त्याने स्फोटाचा संपूर्ण कट सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सर्व पुरावे गोळा केले. न्यायालयाने ४९ आरोपींना दोषी ठरवले. आता २८ जणांना फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. आरोपींनी बॉम्ब बनवणे, देशविघातक कार्य करणे, बॉम्बस्फोट घडवून आणणे असे दावे आणि पुरावे पोलिसांनी न्यायालात सादर केले. सर्व पुरावे सिद्ध झाल्याने न्यायालाने थेट फाशीची शिक्षा सुनावली आहे.