निलेश गौतम, सटाणा
गेल्या 10 एप्रिल आणि 15 एप्रिल रोजी डांगसौंदाणेसह परिसरात झालेल्या गारपिटीने या भागातील शेतपिके पुर्णपणे उध्वस्त झाली आहेत. जोराचा पाऊस वादळ आणि गारपिटीने क्षतीग्रस्त झालेले कांदा पीक जमिनीतुन काढणे गरजेचे आहे. जमीन सुकल्यांनातर एकरी 15 ते 18 हजार रुपये मजुरी देऊन हा कांदा जमिनीतून बाहेर काढला जात आहे. यातील अर्ध्याहून अधिक कांदा हा जमिनीतच उग्र वास करू लागला आहे. तर उर्वरित कांदा हा दोन चार दिवसाच्या अंतराने सडत आहे.
अनेक ठिकाणी शेतकरी वर्ग या कांद्याला रोट्याव्हेटर मारतांना दिसत आहे.कांद्याच्या या तिखट जखमेने बाळीराजाच्या डोळ्यात अश्रू तरंगत आहेत. अनेकांनी आपले आर्थिक गणित चुकल्यामुळे लग्न, व अन्य प्रोग्राम पुढे ढकलले आहेत तर काहींनी छोटेखानी कार्यक्रम करण्यास पसंती दिली आहे. पीक नुकसानीचे पंचनामे ज्या तत्परतेने करण्याचे आदेश प्रशासनाने दिले त्या तत्परतेने नुकसानीची भरपाई मिळालेली नाही मुख्यमंत्री आलेत खासदार, आमदार, आलेत पालकमंत्र्यांनी आढावा घेतला मात्र अजून बाळीराजाच्या पदरात काही पडलेले नाही.
नातेवाईक व इतरांकडून हात उसनवारी व अन्य मार्गातून पैसा उपलब्ध करून शेतातील खराब कांदा मजुरांकरवी काढण्यात येत आहे. शेतीची पूर्णतः दशा झालेली आहे. शासनाच्या मिळणाऱ्या भरपाई कडे बळीराजा चे लक्ष लागले आहे. पुढचा हंगाम कसा करायचा या विवंचनेत फिरतांना बळीराजा दिसतो आहे. ज्यांच्या कडे थोडा फार कांदा वाचला आहे त्या मालाला गारपीटग्रस्त गावाचा शेतमाल म्हणुन बाजार समित्यां मध्ये सापत्न वागणूक मिळत कवडीमोल दराने विकला जात आहे.
मार्केटला जाण्यासाठी 150 रुपये प्रती क्विंटल भाडे लागत आहे. आणि मार्केट ला गारपीट झालेला भागातील कांदा म्हणून 100 ते 150 रुपये दर मिळत आहे. माल विकून वाहन भाडे पुर्ण होत नसल्याने नेमका हा शेत माल विकायचा तरी कश्याला असा यक्ष प्रश्न बळीराजाला पडला आहे. गारपीट ग्रस्त शेतीला जे भरपाई म्हणून सरकार देईल ते देईल मात्र जो थोड्याफार प्रमाणात कांदा बाजार समित्यांमध्ये विकला जात आहे.
कांद्याला सरकारने ज्या पद्धतीने रब्बी कांद्याला 350 रुपये अनुदान दिले आहे. त्याच प्रमाणे उन्हाळी कांद्याला द्यावे व हे अनुदान गारपीट ग्रस्त गावांना 30 जून 2023 पर्यन्त विक्री करण्यात येणाऱ्या कांद्याला द्यावे, चालू वीजबिल 100%माफ करावे,गारपीटग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ करून खरीप पिकासाठी नवीन कर्ज उपलब्ध करून घ्यावे अशी मागणी बाजार समितीचे संचालक संजय सोनवणे व परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.
Agriculture Onion Farm Hailstorm Unseasonal Rainfall Loss