मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गावांच्या विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा शेतकरी व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. मालेगाव तालुक्यात शासनाच्या विविध योजनाची माहिती गाव पातळीवर पोहचविण्या करिता कृषीमंत्री श्री. भुसे यांचा गावनिहाय दौरा आयोजित करण्यात आला होता. या दौर्याच्या वेळी उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकायरी अभियंता अरविंद महाजन, कार्यकारी अभियंता श्रीमती वाघमारे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, विद्युत विभागाचे श्री. भामरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सरपंच, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला पुरुष यावेळी उपस्थित होते.
यावेळी मंत्री भुसे म्हणाले की, मालेगाव तालुक्याचा नानाजी देशमख संजीवनी प्रकल्प योजनेत सहभाग झाल्याने या योजनाचा लाभ येणाऱ्या काळात मालेगावातील जनतेला होणार आहे. तसेच शेतकरी महिलांनी आपले नाव लक्ष्मी मुक्ती योजनेंतर्गत सात बारा उतारावर लावून घ्यावे. यापुढे गावात जे काम होईल ते दर्जेदार पध्दतीने होण्यासाठी गावकर्यांनी देखील त्यामध्ये सहभाग घेऊन कामामध्ये तडजोड केली जाणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असेही कृषीमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी सांगितले. ट्रान्सफॉर्मर बदलणे, ग्रामीण पाणी पुरवठाची कामे पूर्ण करणे, कृषी विभागाच्या योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणे, जास्तीत जास्त शेतकर्यांना शेतकरी योजनेचा लाभ मिळावा यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत.
कृषीमंत्री श्री. भुसे यांनी तालुक्यातील आघार बु., पांढरुण, तळवाडे, दुंधे, कोठरे बु, सातमाने, रावळगाव, जळगाव (गा.) पिंपळगाव या गावामध्ये जाऊन तेथील जनतेशी संवाद साधून कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे त्यांनी गांवकऱ्यांना आवाहन केले.
यावेळी गावकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत होणे, वीज फिटर, डीपी नवीन टाकणे, गावातील अंतर्गत रस्ते, शिवार रस्ते, पिण्याच्या पाणी पुरवठा, व्यायाम शाळेचे साहित्य, शेतकरी अनुदान, संजय गांधी अनुदान, श्रावण बाळ अनुदान या योजनाचा लाभ मिळावा म्हणून उपस्थित गावकऱ्यांनी मंत्री महोदय यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.