मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वातावरणातील बदल, गारपीट व अतिवृष्टी यासारख्या समस्यांपासून द्राक्षबागांचे संरक्षण करण्यासाठी त्यावर प्लास्टिक आच्छादन लावण्याचा प्रयोग राज्यात करण्यात येणार असून चालू वर्षात प्रायोगिक तत्वावर १०० हेक्टर क्षेत्रावर हे आच्छादन लावण्यात येईल. त्यानंतर त्याची राज्यभरात अंमलबजावणी करण्यात येईल, असे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य अनिल बाबर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले की, राज्यात द्राक्षाचे १.२० लाख हेक्टर तर डाळिंबाचे १.६६ लाख हेक्टर क्षेत्र असून या पिकाच्या निर्यातीतून मोठा महसूल राज्याला मिळतो आहे, मात्र अवकाळी पाऊस अथवा गारपीट सारखे संकट आल्यास या पिकांचे मोठे नुकसान होत असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी डिझाईन केलेले लोखंडी संरचना, प्लास्टिक आच्छादन असे स्ट्रक्चरचा प्रभावी उपाय काही शेतकऱ्यांनी सूचवला होता. वातावरणात बदल होत असेल तेव्हा प्लास्टिक आच्छादनाची तात्काळ व्यवस्था करता येईल, गरजेप्रमाणे या आच्छादनाचा वापर करता येईल, यासाठी चार ते साडेचार लाख रुपये प्रतिएकर खर्च येऊ शकतो या संशोधनाचा आढावा घेण्याचे निर्देश राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठाला देण्यात आले होते त्यांनी तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल सादर केला आहे. प्लास्टिक आच्छादन देऊन पिके संरक्षित करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचा काही हिस्सा केंद्राने दिल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.
चालू वर्षात प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील १०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा संरक्षित करण्यासाठी प्लास्टिक आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात येणार असून संगणकीय सोडत काढून शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल, असे सांगून पुढील काळात या प्रयोगासाठी आर्थिक निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल असेही कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. या लक्षवेधीवरील चर्चेत हिरामण खोसकर, मनीषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.