अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बोगस कृषी उत्पादनांची विक्री करून शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांना दहा वर्षे तुरुंगवास होईल, अशी तरतूद असलेला कायदा येत्या अधिवेशनकाळात आणणार असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
कृषी उत्पादनांची विक्री करणाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. खते, बी-बियाणे तसेच इतर उत्पादनांमध्ये फसवणुकीची प्रकरणे पुढे आली आहेत. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असा कायदा आल्यास शेतकऱ्यांची फसवणूक थांबण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा संदेश या माध्यमातून जाणार आहे.
अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या धाडसत्रात खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आल्याने आज अकोला येथे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी काढता पाय घेतला. तसेच त्यांनी या धाडी मीच टाकण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले.
धाडीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काही खासगी व्यक्ती तथा कृषी मंत्री यांच्या जवळचे नागरिक असल्याचा प्रश्न माध्यमांनी सत्तार यांना विचारला असता त्यांनी गवळी हा कृषी अधिकारी असून भट्टड हा माझा पीए नसल्याचे म्हटले. माझा पीए हा कुलकर्णी असून ते मुंबईत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान माध्यमांच्या प्रश्नांना बगल देत मंत्री सत्ता यांनी रस्ता दिसेल त्या दिशेने धाव घेतली. शेवटी सुरक्षा रक्षकांनी त्यांना दुसरा रस्ता दाखविल्यानंतर ते हळूहळू चालले आणि माध्यमांशी थोडक्यात बोलून निघून गेले.
Agriculture Minister Abdul Sattar Question Answer