छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बरेचदा इतर राज्यांमधील सरकारचे चांगले निर्णय आपल्या राज्यात लागू करण्यात आल्याचे आपण बघतो. दिल्ली सरकारने मोहोल्ला क्लिनिक सुरू केल्यानंतर काही राज्यांनी ही संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला. तसेच आता तेलंगण सरकारने घेतलेला तलाठी रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याला आवडलेला आहे आणि शेतकऱ्यांचे भले होणार असेल तर विचार करायला हरकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
तेलंगण राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी अलीकडेच तलाठी पद रद्द करण्याची घोषणा केली. या घोषणेनंतर शेजारच्या राज्यांचे विशेष लक्ष वेधले गेले. त्यातही महाराष्ट्रात यासंदर्भात जास्त चर्चा होऊ लागली. कारण महाराष्ट्रात तलाठी पदाला वेगळे महत्त्व आहे व अनेक सरकारी कामे या पदाच्या मार्फत होत असतात. त्यामुळे पत्रकारांशी संवाद साधताना कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी देखील यासंदर्भात मोठे विधान केले आहे.
तेलंगणा सरकारने तलाठी पद रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने तेथील शेतकऱ्यांना फायदा होत असेल तर असा निर्णय घेण्याच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारही विचार करू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे लक्षात आले तर याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याशी बोलेन, असे ते म्हणाले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.आर. राव यांच्या बीआरएस पक्षाची गेल्या आठवड्यात शहरात सभा झाली. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी तेलंगणा राज्यात तलाठी हे पद रद्द करण्यात आल्याचे सांगितले. याच सभेचा संदर्भ देत, पत्रकारांनी राज्यात तेलंगणासारखे तलाठी पद रद्द करणार का, असा सवाल केला. या प्रश्नाचे उत्तर देताना कृषीमंत्र्यांनी गरज भासल्यास संबंधित मंत्र्यांशी बोलणार असल्याचे सांगितले.
तलाठ्याची गरजच नाही
यापूर्वी ग्रामविकास, महसूल आणि कृषी विभाग यांच्यात समन्वय होता. मात्र आता महसूल विभागाकडे केवायसीच्या माध्यमातून अचूक माहिती मिळते. त्यामुळे तलाठ्याची गरजच उरली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिळवणूक थांबणार असेल तर महसूलमंत्र्यांना तलाठी पद रद्द करण्याची नक्कीच विनंती करेन. कारण ते खाते माझ्याकडे नाही. माझ्या खात्याच्या बाबतीत काही असते तर मी नक्की बोललो असतो, असेही अब्दूल सत्तार म्हणाले.
Agriculture Minister Abdul Sattar on Big Decision