नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विधानसभेचे येथे सुरू असलेले अधिवेशन सध्या चांगलेच गाजते आहे. सीमावादानंतर आता विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रकरण समोर आणले आहे. सत्तारांकडून सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहिम राबवली जात असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. तसेच, सत्तारांनी मविआच्या सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. या बेकायदा भूखंड वाटप प्रकरणी सत्तारांनी सत्तेचा दुरुपयोग केला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. आता या प्रकरणी सत्तार आज काय खुलासा करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, सत्तारांनी त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच सिल्लोड येथे कृषी महोत्सवाचे दि. १ ते १० जानेवारी दरम्यान आयोजन केले आहे. यासाठी कृषी आयुक्तांनी राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना पैसे गोळा करण्याचे आदेश दिल्याचे कृषी संचालकाने सांगितले आहे. या प्रदर्शनासाठी छापण्यात आलेले कूपन विकण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आल्यामुळे अनेक अधिकारी तणावाखाली आले आहेत. कृषी महोत्सवाचा नावाने तिकीट छापून वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला. त्यावरून सभागृहात चांगलाच गोंधळ निर्माण झाला.
अजित पवार पुढे म्हणाले की, अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात होत असलेल्या सिल्लोड कृषी महोत्सवासाठी कृषी विभागात चक्क वसुली मोहीम राबवली जात आहे. या प्रदर्शनासाठी तिकिटे छापण्यात आली आहेत. त्यासाठी काही दरही ठरवण्यात आले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा अधिक तालुके आहेत, त्या ठिकाणी प्लॅटिनम प्रवेशिका देण्यात आली आहेत. यासाठी २५ हजार रुपये दर ठरवला गेला आहे. तर इतर प्रवेशिकांचे ५ हजार, ७.५ हजार आणि १० हजार दर ठरवण्यात आले आहेत. या सर्व गोष्टींचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा दावा पवारांनी केला आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1607290581369192448?s=20&t=HMY_5XfmB0lCCvKVEutFjQ
अजित पवार पुढे म्हणाले की, इतकेच नव्हे तर अब्दुल सत्तार हे मागच्या सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील ३७ एकर सरकारी जमीन वाटप करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतरही भूखंड वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला भूखंड वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेत उघड झाला. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. तर दुसरीकडे विरोधकांच्या या सर्व आरोपांवरून सत्तार यांनी प्रतिक्रिया देतांना आपल्यावरील आरोपांना सभागृहातच उत्तर देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ते आज विधिमंडळात काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
कृषी प्रदर्शनाबाबत वाद सुरू असताना वाशिम जिल्ह्यातील मौजे घोडबाभूळ येथील गायरानासाठी आरक्षित असलेल्या ३७ एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. गायरान जमीन आणि सिल्लोड येथील कृषी महोत्सव यावरून विरोधकांकडून आरोप होत असतानाच अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली की, माझ्यावर झालेले आरोप सभागृहात झाले असल्याने याला उत्तर देखील सभागृहातच देणार आहे.
https://twitter.com/AbdulSattar_99/status/1607345633903652866?s=20&t=HMY_5XfmB0lCCvKVEutFjQ
Agriculture Minister Abdul Sattar Assembly Session
Maharashtra Winter Nagpur Washim Land Issue Agri Exhibition