पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या घराघरात एकच चर्चा आहे ती म्हणजे टोमेॅटोचे दर. आंबा आणि सफरचंदापेक्षाही टोमॅटो महाग असल्याचे दिसून येत आहे. याला अनेक कारणे आहेत. चार महिन्यांपूर्वी टोमॅटोला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी अक्षरशः फेकून दिला होता. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवडच केली नाही. साहजिकच उ्पादन झाले नाही म्हणून आवक कमी आहे. परिणामी, सध्या टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या टोमॅटोचे दर कुठे १००, कुठे १५० तर कुठे २०० रुपये किलोने विक्री होत आहे.
पुरवठा आणि दर
सध्या देशभरात टोमॅटोच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. मोजक्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी टोमॅटो आहेत, त्यांना मोठा फायदा होत आहे. बाजारात टोमॅटोचा पुरवठा कमी असल्यामुळं दरात मोठी वाढ झाल्याचं बोललं जात आहे. सध्या महराष्ट्रात देखील टोमॅटोचे दर हे १००ते १२० रुपये प्रतिकिलोच्या पर्यंत आहेत. तर काही ठिकाणी ते१४०ते १५० रुपये प्रतिकिलोच्या आसपास टोमॅटोचे दर आहेत. महाराष्ट्रात टोमॅटोच्या दरात एवढी वाढ का होते आहे? साधारणतः एप्रिलच्या मध्यापासून जूनच्या सुरुवातीपर्यंत बाजारात माती बोल भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून दिला जात होता. उत्पादन खर्च निघणेही शक्य नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. साधारण: जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून टोमॅटोच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. एप्रिल ते मे महिन्याच्या काळात प्रचंड ऊन होते, अशातच टोमॅटोला दर नसल्यामुळं शेतकऱ्यांनी लागवडी करणे सोडून दिले होते.
आणखी भाव वाढणार
मातीमोल भाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवड करण्याचे सोडून दिल्यामुळे बाजारात माल येत नाही, त्यामुळे बाजारात टोमॅटोच्या दरात मोठी वाढ झाली. दरम्यान, १०एप्रिल ते ५ मे पर्यंत जर टोमॅटोची लागवड केली, तर त्याला ऑगस्ट मध्ये सर्वोच्च दर मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. यानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड देखील केली. मात्र, बाजारभाव नसल्यामुळे त्या शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक सोडून दिले. मात्र पुढे जाऊन बाजार भाव वाढण्याची शक्यता असल्याचे माहिती कृषी अभ्यासकांनी शेतकऱ्यांनी दिली होती. तरीदेखील काही शेतकऱ्यांनी टोमॅटोचे पिक उपटून काढले. २५ जुलैच्या पुढे टोमॅटोचा पुरवठा वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर टोमॅटोच्या दरात काही प्रमाणात घट येऊ शकते. मात्र, तेव्हासुद्धा टोमॅटोला सुमारे७० रुपयांचा दर राहू शकतो हा दर १५ ऑगस्टपर्यंत राहू शकतो, ऑगस्टनंतर टोमॅटोचे दर कमी होण्यास सुरुवात होईल. सप्टेंबरमध्येही टोमॅटोचे दर खूप कमी राहतील, वास्तविक टोमॅटो हे नाशवंत पीक असल्याने त्याचा शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही असेही दिसून येते.
.