सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतकरी मोठ्या कष्टाने शेतीमाल पिकवतो परंतु जेव्हा बाजारात हा माल नेला जातो तेव्हा त्याला किती भाव मिळेल याची काहीही खात्री उरलेली नाही, गेल्या काही दिवसात याचा शेतकऱ्यांना वारंवार अनुभव येऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याचे चक्क २५ पैसे दराने कांदे विकले गेले होते. त्यानंतर आता ८० रुपयाचे टरबूज चक्क ८० पैशाला विकले गेले व्यापारांकडून शेतकऱ्यांची लूट होत आहे सोलापुरात हा प्रकार घडला असून याबद्दल शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे
कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक चिंतेत आहेत. शेतकऱ्यांना २ ते ५ रुपये किलो दराने कांदे विकण्याची वेळ आली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. आता टरबूजच्या बाबतीतही असाच प्रकार घडताना दिसत आहे. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात उन्हाळ्यात ठिकठिकाणी कलिंगड म्हणजे टरबुजाची मोठ्या प्रमाणावर बाजारात आवक होते.
कोणत्याही शेतमालाची बाजारात आवक वाढली की भाव कोसळतात, सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यातील बिटरगाव वांगी गावातील रामभाऊ रोडगे या शेतकऱ्याला असाच वाईट अनुभव आला. त्याच्या कलिंगडाला चक्क ८० पैसे दर मिळाला, कारण ३ टन टन कलिंगडला केवळ ३४०० रुपये मिळाल्याने बिचारा हा शेतकरी वैतागला. यामुळे पदरमोड तोडणी मजुरी आणि टेम्पो भाड्याचा खर्च भागवायला देखील रामभाऊ रोडगे यांना खिशातून ४५६० रुपये भरुन घरी परतावे लागले आहे.
त्यामुळे लाखो रुपये खर्च करून कलिंगडे पिकवून जर ती बेभाव विक्री होत असेल तर विषारी औषध त्याची बाटली खरेदी करून जीवन संपावे असे वाटते अशी भावना या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे, आतातरी शासनाने शेतकऱ्यांचा विचार करावा आणि शेतमालाला हमीभाव द्यावा अशी मागणी देखील रोडगे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे यापुढे क्रेट ऐवजी नगावर किंवा किलोवर कलिंगडे विकण्याची पद्धत वापरावी, अशी मागणी कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.
विशेष म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत असाच काहीसा प्रकार कांदा दराच्या बाबती घडला होता. १० पोती कांद्यांची विक्री केल्यावर राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याला चक्क २ रुपये मिळाले. ते पैसेही चेक स्वरुपात देण्यात आले होते.
Agriculture Farmer Melon Very Low Rate Trouble