भंडारा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अतिवृष्टीमुळे यंदा शेतीचे आतोनात नुकसान झाले. या नुकसानीपोटी राज्य सरकारने भरपाई जाहीर केली आणि आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम जमा केली जात आहे. जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला मिळालेली नुकसान भरपाई अक्षरशः त्याची चेष्टा करणारीच ठरली आहे. त्यामुळेच या शेतकऱ्यानेही गांधीगिरी करीत आपला निषेध व्यक्त केला आहे.
राज्यात यंदा प्रमाणेच मागील वर्षी अवकाळी व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीची हानी सर्वाधिक पाहायला मिळाली. यामुळे राज्यातील खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन वर्षात शेतकरी बांधवांच्या हातून रब्बी खरीप हंगाम पूर्ण वाया गेला आहे. यंदाही जून ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विदर्भात अनेक जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता मागील वर्षाची अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या बदल्यात नुकसान भरपाई देण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीची तब्बल वर्षभराने नुकसान भरपाई मिळाली. एका शेतकऱ्याचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले असताना प्रत्यक्षात मदतीपोटी केवळ १ हजार रुपये बँक खात्यात जमा झाले. सदर तुटपुंजी मदत पाहून शेतकऱ्याचा तीव्र संताप झाला त्यामुळे त्यांनीही मदत त्यामुळे त्याने ही शासनाकडून आलेली मदत पुन्हा शासनाला परत केली आहे. अशा प्रकारे आम्हाला भीक नको असे देखील शेतकऱ्यांकडून म्हटले जात आहे.
भंडारा लाखांदूर तालुक्यातील किरमटी येथील रहिवासी जयपाल प्रकाश भांडारकर , त्याने एक हजार रुपये लाखांदूर तहसील कार्यालयाच्या बँक खात्यात जमा करून शासनाला परत केले. भंडारा, चंद्रपूर, नागपूर, वर्धा आदि जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकरी बांधवांना शासनाकडून नुकसान भरपाई अनुदान स्वरूपात देण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल, असे वाटत असताना अत्यंत तुटपुंजी किंवा तोकड्या पद्धतीने नुकसान भरपाई वाटत येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी तथा संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली नाही अशा शेतकरी बांधवांना लवकरच नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहे. विदर्भात २०२१ व २०२२ मध्ये झालेल्या गारपीट, अवकाळीच्या नुकसानीचे कोट्यावधीचे अनुदान विभागाला वितरित करण्यात आले आहे. बाधित नागरिकांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी अतिवृष्टी व गारपीट यामुळे रब्बी हंगामात तालुक्यात शेकडो शेतकऱ्यांसह जयपाल यांच्याही शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने गारपीटग्रस्तांना मदत घोषित केली. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून अहवाल सादर केला. यादीत जयपाल यांचेही नाव असून बँक खात्यात केवळ एक हजार रुपये. जमा झाले. मात्र ही तुटपुंजी रक्कम पाहून भांडारकर संतप्त झाले. त्यानंतर त्यांनी तडक लाखांदूर तहसील कार्यालय गाठून शासनाच्या बँक खात्यात १ हजार रुपये जमा केले. तसेच लाखांदूर तहसीलदार वैभव पवार यांची भेट घेऊन त्यांना तसे निवेदनही दिले.
शेतकऱ्यांना ही भरपाई जाहीर करताना जुन्या जीआर विचारात घेतला आहे. नवा जीआर विचारात घेतला असता तर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असता. आता ही रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टाच म्हणावी लागेल. कुठेतरी वास्तववादी निकषांचा भरपाई देताना विचार व्हायला हवा, असे मत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
Agriculture Farm Crop Loss Compensation Farmer Gandhigiri