नागपूर – एखाद्या लग्नसमारंभात ड्रोन कॅमेरा पहिला असेल, या ड्रोन कॅमेराने काय करता येऊ शकते, याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. परंतु या द्वारे अनेक उपयोगी कामे करता येतात. अगदी छोटे ड्रोन मुले खेळणी किंवा मजा म्हणून वापरू शकता. विशेषतः अनेक जण गावी गेल्यावर आपल्या शेतात उडविण्याची मजा घेऊ शकतात. तसेच त्याचे बाकी पण उपयोग आहेत. उंचवरील ठिकाणी वस्तु पोचवायची असेल, रुग्ण वृद्धाला तातडीने औषध पाठवायचे असेल, कुठल्या उंचावरील ठिकाणी टेहळणी करायची आहे किंवा छायाचित्रण करायचे आहे का ? ड्रोन सेवेला हजर असतो इतकेच नव्हे तर हेरगिरीसाठी लष्करात त्याचे अनेक उपयोग आहेत.
कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर केल्याने ग्रामीण भागात 50 लाख रोजगार निर्माण होऊ शकतात असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. नागपुरात अॅग्रोव्हिजन प्रदर्शनाच्या समारोप समारंभात उपस्थित शेतकरी व इतरांना संबोधित करताना गडकरी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की, त्यांनी कृषी क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत धोरण तयार करण्याच्या गरजेबाबत चर्चा केली आहे. तसेच त्यांनी शेतकर्यांना सांगितले की त्यांनी त्यांच्या शेतात ड्रोनचा वापर सुरू केला आहे आणि कीटकनाशकांची यांत्रिक फवारणी कमी केली आहे.
कृषी क्षेत्रातील विविध संधींबाबत बोलताना गडकरी म्हणाले की, कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराबाबत धोरण तयार करण्यासाठी मी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी चर्चा केली आहे. ड्रोन हे कृषी आणि एमएसएमईशी संबंधित आहेत आणि केवळ ड्रोनमुळे ग्रामीण क्षेत्रात एका वर्षात लाखो रोजगार निर्माण होऊ शकतात. याशिवाय शेतकऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.
या कार्यक्रमात पुढे बोलताना गडकरी म्हणाले की, लिथियम-आयन बॅटरीवर चालणाऱ्या ड्रोनची किंमत सुमारे 6 लाख रुपये असेल, तर इथेनॉल इंधनावर चालणाऱ्या मानवरहित हवाई वाहनाची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये असेल, जी खूपच स्वस्त असेल. ड्रोनमधून कीटकनाशक फवारणीसाठी पायलटची आवश्यकता असेल आणि यामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.