मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करुन अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्य सरकारमध्ये मंत्री झालेल्या धनंजय मुंडे यांना वाढदिवसाच्या दिवशी विशेष गिफ्ट मिळाले आहे. मुंडे यांचा शनिवारी वाढदिवस होता. खाते वाटपात मुंडे यांच्याकडे कृषी खाते आले आहे. राज्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुंडे यांनी वाढदिवस साजरा करण्याचे जाहीर केले. त्यातच त्यांना मिळालेल्या विशेष गिफ्टाबाबत त्यांनीच खुलासा केला आहे.
धनंजय मुंडे म्हणाले की, आज जन्मदिनाच्या दिवशी कृषी खात्याच्या रूपाने या शेतकऱ्याच्या मुलाला विशेष गिफ्ट मिळाले, याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे मनस्वी आभार…!
आज मंत्रालयात जाऊन कृषी विभागाचा आढावा घेतला. मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप, शेडनेट यांचे प्रलंबित अर्ज तातडीने निकाली काढावेत असे निर्देश विभागाला देण्यात आले. त्याचबरोबर विभागातील रिक्त पदांचाही अहवाल मागितला आहे.
राज्यात व विशेषकरून मराठवाड्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. शेतकऱ्यांनी संभाव्य नुकसान टाळण्यासाठी एक रुपयात पीकविमा अंतर्गत विमा अर्ज तातडीने भरून घ्यावेत. विमा भरताना कोणतेही ग्राहक सेवा केंद्र पैसे मागत असल्यास त्याची प्रशासनाकडे तक्रार करावी, त्याची तात्काळ दखल घेऊन कडक कारवाई करण्यात येईल.
राज्यात बोगस बियाण्यांच्या माध्यमातून कुठेही शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, याबाबतही धडक कारवाया करण्याचे निर्देश विभागाला दिले आहेत. कृषी विभागाच्या शेतकरी हिताच्या अनेक प्रभावी योजना आहेत, त्यातील लाभार्थी संख्या वाढविण्यासाठीही आगामी काळात प्रयत्न केले जातील.
पेरणी पासून ते पिकाला योग्य भाव मिळवून देण्यापर्यंत सरकारची जबाबदारी निष्ठेने पार पाडून विभागाची प्रतिष्ठा वाढेल, असे कार्य सर्वांच्या सहकार्यातून नक्कीच करून दाखवू, असा विश्वास आहे, असे मुंडे म्हणाले