नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या भागाचा आज कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी दौरा केला. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. दरम्यान, शेतीचे आतोनात नुकसान झालेले असताना कृषीमंत्र्यांनी अंधारात पाहणी करुन नक्की काय साध्य केले, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. तसेच, या दौऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी, पंचकेश्वर व रानवड येथील अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या भागाची कृषी मंत्री श्री. सत्तार यांनी पाहणी करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतातील द्राक्ष व पिकांच्या झालेल्या नुकसानीची कृषीमंत्री यांनी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी केली. झालेल्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून घेण्याच्या सूचनाही कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित कृषि अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पाहणी दौरा करून झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेद्वारे सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी दिली.
या पाहणी दौऱ्यात कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसिलदार शरद घोरपडे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
कृषीमंत्र्यांकडून केवळ औपचारिकता
कृषीमंत्र्यांनी अंधारात पाहणी दौरा केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आधीच शेतकरी अवकाळी पावसामुळे त्रस्त आहेत. त्यात आता कृषीमंत्र्यांनी अंधारात पाहणी करुन नक्की काय साध्य केले. शेतातील पिकांची पाहणी करुन वास्तव जाणून घेण्याऐवजी केवळ शेतकऱ्यांशी मंत्र्यांनी संवाद साधला. यातून आम्हाला अपेक्षित मदत नक्की मिळेल का, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
https://twitter.com/InfoNashik/status/1638227240835219456?s=20
Agri Minister Sattar Nashik District Visit in Night