नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत गुवाहाटीला कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेलेले नाहीत. त्यांनी आज कृषीथॉन प्रदर्शनाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शिंदे गटातील किंवा राज्य सरकारमधील कोणत्याही मंत्र्याची आणि कसल्याही प्रकारची नाराजी नाही. मी पुन्हा एकदा गुवाहाटीला जाईल आणि दर्शन घेईन. माझी कुणाशीही नाराजी नाही. मी कृषी प्रदर्शनाला वेळ दिली होती. त्यामुळे मी या नियोजित कार्यक्रमाला आलो आहे. मुख्यमंत्री गुवाहाटीला गेले याचा अर्थ सगळा महाराष्ट्र गेला आहे.
सत्तार पुढे म्हणाले की, काही लोकांनी विचारलं ती, तुम्ही गुवाहाटीला का नाही गेले. मात्र हा कार्यक्रम नियोजित असल्याने मी इथे आलो आहे. यापूर्वी आम्हाला २१ नोव्हेंबरला जायचे होते, नंतर ही तारीख २६ नोव्हेंबर करण्यात आली. पण हा कार्यक्रम नियोजित होता. समजा मी इथे न येता गुवाहाटीला गेलो असतो तर परत आम्हाला विचारलं असतं की, यांना शेतकऱ्यांची जाणीव नाही, गेले तिकडे यांचं भाग्य बघायला, असेही सत्तार म्हणाले.
हिवाळी अधिवेशनात चर्चा
शेतीसंदर्भात सत्तार म्हणाले की, नाशिक हा महाराष्ट्रातला आगळा वेगळा जिल्हा आहे. नवनवीन तंत्रज्ञान घेऊन येथील शेतकरी शेती करत आहेत.जर काही नैसर्गिक संकट आलं की, शेतकरी अडचणीत येतो. पहिल्यांदाच शेतकऱ्यांना अवकाळीने झालेल्या नुकसानीची त्वरित भरपाई मिळाली आहे. अजून परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई देणे बाकी आहे. कृषी विद्यापीठांमध्ये नवनवीन शोध लावण्याचे काम सुरू आहे. त्याचा नक्कीच शेतकऱ्यांना फायदा होईल. आगामी हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन यावर चर्चा होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
Agriculture Minister Abdul Sattar on Guwahati Tour
Politics Nashik Farm