छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गौतमी पाटीलने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. यात तिच्या चाहत्यांमध्ये अनेक राजकारणीही आहेत. अर्थात काही पुढारी बिनधास्त तिचं कौतुक करतात तर काही पुढारी हातचं राखून. गौतमी पाटीलच्यासंदर्भातील एका प्रश्नावर कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचं नाव घेऊन मिश्किल उत्तर दिलं. त्याची चांगलीच चर्चा होतेय.
गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा एक व्हिडियो व्हायरल झाला होता. त्यावेळी तिची बरीच बदनामी झाली. पण आता तिचा आणखी एक व्हिडियो व्हायरल होत आहे आणि त्यात ती बैलासमोर डान्स करत आहे. आता खरं तर या प्रश्नाचा आणि अजित पवार यांचा काहीच संबंध नाही. पण गंमत म्हणून एकाने अजितदादांना यासंदर्भात प्रश्न विचारला.
अजितदादांनी उलट सवाल करत फिरकी घेतली. ‘ती बैलासमोर नाचेल नाहीतर आणखी कुणासमोर नाचेल. तुला काय वाईट वाटलं त्यात? तुला काय त्रास होत आहे?’ असा मिश्किल सवाल अजितदादांनी केली. त्यानंतर कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांना अजितदादांच्या उत्तराविषयी विचारण्यात आले. त्यावर ‘ज्यांचे वय डोळे मारण्याचे आहे ते डोळे मारतात. किंवा ज्यांनी लहानपणी डोळे मारले नसतील ते मोठेपणी मारत आहेत. सध्या डोळे मारण्याचा सिझन सुरू आहे. त्यामुळे अजित पवार जे काही बोलतात त्याला महत्त्व आहे. कारण ते विरोधीपक्षनेते आहेत,’ असे उत्तर सत्तारांनी दिले.
डान्स बघायला अजितदादांना बोलवेन
गौतमी पाटीलचा डान्स बघता का, असा सवालही सत्तार यांना करण्यात आला. त्यावर सिल्लोडला कृषी महोत्सवात बघितला होता. तेव्हा खूप लोक आले होते. पुन्हा एकदा त्यांचा कार्यक्रम आयोजित करेन आणि अजितदादांना कार्यक्रमाचं निमंत्रण देईन, असे अब्दूल सत्तार म्हणाले.
Agri Minister Abdul Sattar on Dancer Gautami Patil Program