रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बरेचदा आपल्या विभागातील गोंधळ बाहेर कळू नये म्हणून मंत्री किंवा राज्यमंत्री अधिकाऱ्यांना चार भिंतींच्या आत रागवत असतात. विशेषतः ज्याठिकाणी माध्यमांचे प्रतिनिधी असतील तिथे तर काळजी घेतातच घेतात. पण राज्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी आपल्या अधिकाऱ्यांना दूरचित्रवाहिनीच्या कॅमेऱ्यांपुढेच झापले.
मुळात अब्दूल सत्तार विविध कारणांनी सतत वादात असतात. पण यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना झापताना माध्यमांचे प्रतिनिधी बाजुला आहेत, याचा विचार केला नाही. आणि त्याला कारणही तसेच होते. या अधिकाऱ्यांनी एका शासकीय कार्यक्रमाचे निमंत्रण खासदारांना व्हॉट्सएपवर पाठवले होते. अब्दूल सत्तार यांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.
हल्ली लग्नाचेही निमंत्रण व्हॉट्सएपवर पाठविले जाते. पण तरीही एक फोन आवर्जून केला जातो. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र त्याचीही तसदी घेतली नाही. एखादा शासकीय कार्यक्रम असला की त्या भागातील खासदार, आमदार यांना रितसर निमंत्रण देणे आवश्यक असते. रायगड येथील रोहा तालुक्यात किल्ला नावाचे गाव आहे.
या गावात कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा होता. इथे आधीपासूनच कृषी विज्ञान केंद्र आहे. परंतु, आता नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या सोहळ्याला स्वतः कृषीमंत्री अब्दूल सत्तार, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे व आदिती तटकरे आदींची उपस्थिती होती.
सुनील तटकरेंना व्हॉट्सएपवर निमंत्रण
या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे व श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे उपस्थित होते. परंतु, खासदार सुनील तटकरे यांना कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी व्हॉट्सएपवर निमंत्रण पाठविले. तटकरे हजरही झाले, परंतु अधिकाऱ्यांना ही चूक महागात पडली.
मंत्र्यांकडून कानउघाडणी
खासदारांना व्हॉट्सएपवरून निमंत्रण गेल्याचे कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांना कळले तेव्हा ते चांगलेच संतापले. त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांचे कॅमेरे सुरू असल्याची आठवण सत्तारांना करून दिली. पण, सत्तार यांनी ‘जे आहे ते आहे’ असे म्हणत अधिकाऱ्यांची कानउघाडणी सुरूच ठेवली.
Agri Minister Abdul Sattar Lashed Government Officers