अरुणाचलेश्वर, थिरुवन्नामलाई
(अग्नीतत्त्वाचे शिवमंदिर!)
तमिळनाडूत पंच महातत्वांपासून तयार झालेली पांच मोठी शिव मंदिरं हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहेत. यात अण्णामलाई टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या थिरुवन्नामलाई नावाच्या गावांतील अण्णामलाईय्यार मंदिर हे अरुणाचलेश्वर नावाने विख्यात आहे. या ठिकाणी पार्वतीने उन्नामुलैयाम्मन किंवा अपिताकुच्चबालाच्या रुपात शिवाची पूजा केली होती. पंचमहाभुतातील अग्नीच्या रुपांत शिवाने येथे वास्तव्य केलेले आहे. या मंदिरातील अण्णामलैयार शिवलिंग हे अग्नीचे प्रतिक मानले जाते.
दहा हेक्टर जागा व्यापणारे हे शिव मंदिर भारतातल्या दहा मोठ्या मंदिरापैकी एक आहे. या मंदिराला चार गोपुरम किंवा प्रवेशद्वार असून इथले पूर्वेकडील ‘राजा गोपुरम’ भारतातले सर्वांत मोठे गोपुर म्हणून प्रसिद्ध आहे. कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात मोठा महोत्सव साजरा केला जातो. त्यादिवशी लाखो भाविकांच्या साक्षीने मंदिरावर लाखो दिव्यांची रोषणाई करतात. मंदिराच्या सर्वोच्च शिखरावर अग्नीचे प्रतिक असलेले शिवलिंग प्रज्वलित केले जाते. सातव्या शतकात देखील या मंदिराचा उल्लेख सापडतो. सातव्या शतकात शैव नयनार म्हणजे शैव गण तेवाराम यांनी ‘पाडाल पेत्रा स्थलम्’ म्हणून या मंदिराची स्थापना केली.
भगवान शिव शंकर येथे कसे आले?
भगवान शिव येथे कसे आले त्याविषयी एक दंतकथा येथे सांगितली जाते. एकदा कैलास पर्वतावर शिव पार्वती मजेत राहत असतांना पार्वतीने सहज गंमतीने भगवान शिवाचे डोळे झाकले. पण तिने क्षणभर डोळे झाकताच सगळे ब्रह्मांड अंधारून गेले. देवांचा एक क्षण म्हणजे पृथ्वीवरील अनेक वर्षे. या हिशोबाने पृथ्वीवर तर अनेक वर्षे अंधार पसरला. या चुकीचे प्राय:श्चित घेण्यासाठी पार्वती अण्णामलाई डोंगरावर आली. अनेक शिवभक्तांप्रमाणेच तिनेही शिवाची आराधना केली. तिचा भक्तीभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी अर्धनारीश्वराच्या रुपांत पार्वतीत स्वत:ला विलीन केले.
या ठिकाणी पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी भगवान शिव अग्नीच्या रुपांत प्रकटले.अण्णामलाई याचा अर्थ होतो लाल रंगाचा पर्वत. हा डोंगर हेच शिवलिंगाचे तसेच अग्नीचे रूप समजले जाते. या पर्वताकड़े तोंड करून अनेक नंदी कोरलेले दिसतात. कारण या पर्वतावर शिवाने स्वत:ला लिंग रुपाने स्थापित केले आहे. पुरातत्व विभागानुसार हा पर्वत प्राचीन पर्वतापैकी एक मानला जातो.
सातव्या शतकांत पल्लव राजांनी बांधले मंदिर
या मंदिराला सातव्या शतकांतील पल्लव राजवटी पासून एकविसाव्या शतकांतील तमिलनाडु शासनकर्त्यापर्यंतचा एक हजार वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे.अरुणाचलेश्वर मंदिराची निर्मिती इ.स. २७५ ते इ.स. ८९७ पर्यंत राज्य करणार्या पल्लव राज वंशातील राजांनी ७ व्या शतकांत केली. त्यांच्या नंतर इ.स. ८४८ पासून इ.स. १२७९ पर्यंत तमिलनाडु प्रान्तावर राज्य करणार्या चोल राजांनी नवव्या शतकांत या मंदिराचा जीर्णोधार केला.त्यांच्या नंतर इ.स.१३३६ ते १६४८ पर्यन्त राज्य करणार्या विजय नगरच्या साम्राज्याचे राजे कृष्णदेवराय यांनी पंच भूत स्थानम् मधल्या पाचही शिव मंदिरांत मोठी भर टाकली. एक हजार खांब असलेले दगडी सभामंडपम त्यांनी या सर्व मंदिरांत बांधले.विशेष म्हणजे हे सर्व सभामंडपम आजही सुस्थितीत आहेत. त्यांच्यावरील शिल्पकला आणि भव्यता आजही स्थापत्य शास्त्राच्या अभ्यासकासाठी अभ्यासाचा विषय आहेत.
भारतातील सर्वांत उंच गोपूर
अण्णामलाई पर्वताच्या पायथ्याशी २५ एकर जागेवर हे मंदिर विस्तारलेले आहे. मंदिराच्या भोवती दगडी तटबंदी आहे.मंदिराच्या पूर्व आणि पश्चिमेच्या भिंती ७०० फूट उंच, दक्षिणेची भिंत १४७९ फूट उंच तर उत्तरे कडची भिंत १५९० फूट उंच आहे. मंदिराच्या चारही दिशांना भव्य प्रवेशव्दार किंवा गोपुर आहेत. यातील पूर्वेकडील गोपुर सर्वांत उंच आणि भव्य आहे.त्याला राजा गोपुरम म्हणतात. अकरा मजल्यांचे हे गोपुर भारतातील सर्वांत उंच गोपुर मानले जाते. विजयनगरच्या कृष्णदेवराय यांनी या गोपुराचे बांधकाम सुरु केले आणि तंजावूरच्या सेवप्पा नायक यांनी ते पूर्ण केले. इतर गोपुरांची नावं दक्षिणेकडील थिरूमंजना गोपुरम, पश्चिमे कडील पेई गोपुरम,तर उत्तरे कडील संन्यासिनी गोपुरमला अम्मानी अम्मन गोपुरम अशी आहेत.
‘लिंगोत्भव’ शिवलिंगम
मुख्य मंदिरातील गर्भगृहात जाण्याच्या मार्गावर इंद्र, अग्निदेव,यमदेव,निरुति,वरुणदेव,वायु देव,कुबेर आणि ईशानदेव यांनी येथे येउन स्थापन केलेली ८ शिवलिंगे दिसतात. मदिराच्या गर्भगृहात ३ फूट उंच गोल आणि चौकोनी आकाराचे मुख्य शिवलिंग आहे. शिवलिंगाला ‘लिंगोत्भव’ म्हणतात.येथे भगवान शिव अग्नीच्या रुपांत विराजमान आहेत. त्यांच्या चरणापाशी वराह रुपांत भगवान विष्णु तर डोक्यावर हंस रुपांत ब्रह्मदेव दाखविले आहेत. मंदिराला ६ प्राकार असून प्रत्येक प्राकारात ६ फूट उंचीचे मोठ मोठे नंदी कोरलेले आहेत.काळया पाषाणातुन हे महानंदी कोरलेले आहेत.मंदिरांत दीपमंडपम, वसंत मंडपम, ब्रह्म तीर्थम, यनाई थिराई कोंड विनयाग, अरुणागिरीनाथार मंडपम, कल्याणसिंग सुंदर ईश्वरमंडपम असे अनेक सभा मंडप आहेत.
२५ एकरवरील विशल शिवमंदिर
मंदिर प्रांगण अनेक देवतांच्या मंदिरानी शोभिवंत झाले आहे. येथे कम्बाथू इल्यानार सुब्रमण्य मंदिर,एक हजार खांबांचा हॉल किंवा मंडपम, सर्व सिद्धी विनायक मंदिर, शिवगंगा तीर्थम,कल्याण ईश्वरार सुंदर मंदिर एकाच भव्य शिलेतून कोरलेला १६ फूट उंचमहानंदी, जेथे रमण महर्षि ईश्वररूप झाले ते श्री पाताल लिंगम मंदिर,अरुणा गिरी मंडपम, पुरावी मंडपम,कला कुसरीने नटलेले भव्य काल भैरव मंदिर,मणि मंडपम, ब्रह्म तीर्थम, स्फटिकासारखे शुभ्र लहान आकाराचे नंदी,किली गोपुरम,ध्वज स्तम्भ, श्री अरुणाचलेश्वर संनाधि म्हणजे मुख्य शिवलिंग,त्याच्या बाजूला गणेश मंदिर ,समोर नंदी, बाजूला उन्ना मुथाई अम्मान सन्निधि पहायला मिळतात.त्यानंतर तेल वाती आणि कापुर जाळन्याची वेदी आणि बाहेर आल्यावर प्रसाद काउंटर दिसतो.
प्रमुख उत्सव
श्री अरुणाचलेश्वर मंदिरांत महाशिवरात्री प्रमाणेच कार्तिक पौर्णिमेला ‘कार्तिक दीपम’ नावाचा मोठा उत्सव साजरा केला जातो. अनेक शतकापासून हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी लाखो दिवे येथे प्रज्वलित केले जातात.दहा लाखापेक्षा अधिक श्रद्धालु भाविक त्यावेळी एकत्र येतात.एक अति विशाल दीपक मंदिरा जवळच्या पहाडावर प्रज्वलित करतात.या दिव्याची ज्योत २ ते ३ किमी अंतरावरून देखील दिसते. याशिवाय प्रत्येक पौर्णिमेला अन्नामलाई पर्वताची १४ किमी ची प्रदक्षिणा भाविक अनवाणी पायांनी करतात.याला गिरीवलम असे म्हणतात.त्याच प्रमाणे या मंदिरांत ब्रह्मोत्सव आणि तिरूवुडल नावाचे सण विविध प्रकारची अनुष्ठाने करून साजरे केले जातात.
कसे जावे
चेन्नई पासून थिरुवन्नामलाई १७५ किमी अंतरावर आहे. येथे येण्यासाठी बस मार्ग अतिशय चांगला आहे. चेन्नई प्रमाणेच विल्लूपुरम, बेंगलुरु,पुड्डुचेरी आणि मंगलोर या शहरापासून देखील चांगले बसमार्ग उपलब्ध आहेत. रेल्वेने चेन्नई प्रमाणेच तिरुचिरापल्ली पासून थिरुवन्नामलाई पर्यंत रेल्वे सेवा उपलब्ध आहे. रेल्वे स्टेशन पासून २ किमी अंतरावर श्रीअरुणाचलेश्वर मंदिर आहे.
संपर्क: Arulmigu Arunachaleswarar Temple
Tiruvannamalai- 606 601
Phone: (04175) 252438 and 254425
Agnitatva Shivmandir History Importance