इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – केंद्र सरकारने सैन्य दलात भरतीसाठी अग्निपथ या नवीन योजनेची घोषणा केली आहे. या योजनेच्या समर्थनार्थ आता देशातील उद्योजकही पुढे सरसावले आहेत. अग्निपथ योजनेविषयीची साशंकता सोडून या योजनेची महती आणि महत्व त्यांनी अधोरेखीत करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.अग्निपथ योजनेवरुन देशात रान पेटलेले असताना, या सर्व प्रकारावर महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी दुःख व्यक्त केले. परंतु एवढ्यावर न थांबता त्यांनी या कुशल आणि प्रशिक्षित अग्निवीरांना त्यांच्या ग्रुपमध्ये नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विटवर या योजनेविषयी आणि हिंसक घटनांविषयी भावनांना वाट मोकळी करुन दिली. अग्निपथ योजनेवरुन देशात सुरु असलेल्या हिंसेवरुन दुःखी झाल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेमुळे तरुणांना स्वंयशिस्त लागेल आणि त्यांच्यात क्षमता निर्माण होईल. तसेच त्यांच्याकडे चार वर्षांच्या प्रशिक्षणानंतर कौशल्य ही असेल, या गोष्टी त्यांना रोजगार प्राप्तीसाठी महत्वाच्या ठरतील असे विश्वास त्यांनी व्यक्त केला. महिंद्रा समुह अशा प्रशिक्षित आणि क्षमताप्राप्त तरुणांना रोजगार देण्यासाठी तयार असून अशा अग्निवीरांचे समुहात स्वागत असल्याचे ट्विट महिंद्रा यांनी केले. तसेच प्रशासन आणि उत्पादन मालिकेत त्यांचा महत्वाचा वाटा असेल असेही त्यांनी ट्विट केले आहे.
टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी अग्निवीरांना त्यांच्या समुहात नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी अग्निपथ योजनेलाही पाठिंबा दिला आहे. अग्निपथ ही तरुणांसाठी देशाच्या संरक्षण दलात सेवा बजावण्याची उत्तम संधी असून अशा तरुणांचे टाटा समुहात स्वागत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी दुसरीकडे सैन्य दलात भरतीसाठी तीनही सैन्य दलांनी भरतीची प्रक्रिया सुरु केली आहे. या भरतीची तारीखही घोषीत करण्यात आली आहे. वायुसेनेसाठी भरती प्रक्रिया २४ जूनपासून सुरु करण्यात येईल.नाविक दलासाठी भरती प्रक्रिया २५ जूनपासून सुरु होत आहे. तर आर्मीसाठी १ जुलैपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे.
agneepath agnipath scheme industrialists announcement agnivir employment