इंडिया दर्पण वृत्तसेवा
आग्रा – लग्नाच्या दोन दिवस अगोदर वधूने आपल्या कुटूंबासह महागड्या साड्या, सूट, दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना आग्र्यामध्ये घडली आहे. वरपक्षाने याविषयी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी वधू आणि तिच्या कथित कुटुंबातील सदस्यांना पकडण्यासाठी सापळा रचला होता.
आग्र्यातील हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉलनी सेक्टरमधील रहिवासी तरुणासोबत ही घटना घडली आहे. या तरुणाच्या ओळखीतल्या एकाने लग्नासाठी स्थळ आणलं होतं. मुलगी शिकलेली आहे, कुटुंब गरीब आहे, लग्न करायला पैसे नाहीत असं सांगत मध्यस्थाने मुलीबाबत माहिती सांगितली. तसंच दोन्ही बाजूंचा खर्च मुलाकडच्यांना उचलावा लागेल असंही स्पष्ट केलं. यानंतर मध्यस्थाने २ मार्च रोजी मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम केला.
मुलाच्या घरच्यांना मुलगी पसंत पडली आणि लग्न करण्याचं निश्चित केलं. मुलाकडच्याने सगळा खर्च उचलला. वधूने यावेळी महागड्या साड्या, महागडा लेहेंगाही घेतला. १६ एप्रिलला त्याचं लग्न होणार होतं. निमंत्रण पत्रिकांचं वाटप करुन झालं होतं. मुलगा – मुलगी यांचा रोज फोनवर संवाद होत असे. लग्नाच्या खर्चासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी वधूच्या कुटुंबीयांना ८० हजार रुपयेही ऑनलाइन ट्रान्सफर केले होते. हे सगळं सुरु असतानाच ११ एप्रिल रोजी मुलीचा मोबाईल बंद आला. मुलाने अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
फोन लागला नाही तेव्हा त्या मुलाने मध्यस्थाला फोन केला. त्यानेही फोनही उचलला नाही. तेव्हा तो तरुण मुलगा मुलीने दिलेल्या पत्त्यावर गेला. तिथे कोणीच सापडले नाही हे पाहून त्याला धक्काच बसला. तेव्हा गावप्रमुखाशी संपर्क साधल्यावर त्याला समजलं की या गावात अशा नावाचं कोणीही राहत नाही. या माहितीनंतर मुलाला आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली आणि त्याने जगदीशपुरा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. आता या नवरी मुलीचा आणि तिच्या कथित कुटूंबाचा तपास पोलिस घेत आहेत. त्यांचा तपास लागल्यावर पुराव्याच्या आधारे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असं पोलिस निरीक्षक जगदीशपुरा प्रवींद्र कुमार सिंह यांनी सांगितले.