नाशिक – मंत्रभूमी पासून यंत्रभूमी पर्यंत ओळख असलेल्या नाशिक शहरात आगरटाकळी परिसरातील श्री गोमय मारुती देवस्थान मठाचा तीन दिवसीय जीर्णोद्धार सोहळा संत-महात्मे व मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला असल्याची माहिती श्री मारुती देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे.
नाशिक शहरात श्री समर्थ रामदास स्वामींनी स्वहस्ते स्थापन केलेला गोमय मारुती हा आगार टाकळी येथील मठात आहे. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे या ठिकाणी 12 वर्षापेक्षा वास्तव्य होते ,याठिकाणी पूर्वीपासूनच गोमय मारुतीचे मंदिर ही उभारण्यात आलेले आहे. या मंदिराचा गेल्या साडेतीन वर्षात देणगीदारांचे कोट्यवधी रुपयांचे योगदानातून जीर्णोद्धार करण्यात आला आहे आमदार सौ देवयानी फरांदे यांनी शासनाचे पर्यटन खात्यामार्फत रुपये तीन कोटी चौऱ्यांशी लाखाचा निधी परिसर विकासासाठी दिला आहे. ते काम पूर्ण झाले आहे.
या जिर्णोधार सोहळ्याचा तीन दिवसीय कार्यक्रम व कलशारोहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार (दि 11) पासून सोमवार (दि. 13) डिसेंबर पर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. या तीन दिवसात याठिकाणी वास्तुशांती, सहस्त्र कुंभाभिषेक व कलशारोहण असे कार्यक्रम होणार आहे. सोमवार (दि. 13) डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता प.पू. प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते मंदिराचा कलशारोहण होणार आहे.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून श्री समर्थ रामदास स्वामींचे वंशज प.पू. भूषण स्वामी तसेच समर्थ सेवा मंडळाचे प. पू. योगेश बुवा, प. पू. गोविंद देवगिरी महाराज ऊर्फ आचार्य किशोरजी व्यास आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहरात श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या या गोमय मारुती मंदिराचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहे.
प पू प्रसाद महाराज अंमळनेरकर यांनी मंदिरासाठीचा कळस देणगी दिला असून तो कळस आणि श्री काळाराम मंदिरासाठी परंपरागत पुजाधिकारी व विश्वस्त धनंजय पुजारी यांनी दिलेले महावस्त्र मठात वाजत गाजत पोहोचले असून त्याचे सुवासिनी कडून औक्षण करण्यात आले , आणि विश्वस्तांनी त्याचा स्वीकार केला. कलश व महावस्त्रास सौ अर्चना रोजेकर , सौ राजश्री शौचे सौ जुन्नरे सौ कुलकर्णी यांनी औक्षण केले आणि विश्वस्त सुधीर शिरवाडकर , ज्योतिराव खैरनार , ऍड भानुदास शौचे , सौ अर्चना रोजेकर यांनी स्वागत केले.
कोरोनाची नियामवलीचे संपूर्ण पालन करून या तीन दिवसीय कार्यक्रमाचा नाशिककरांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी मठ याचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी यांचेसह सुधीर शिरवाडकर, ज्योतिराव खैरनार, प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, ॲड. भानुदास शौचे, अर्चना रोजेकर, तहसीलदार अनिल दौंड, यांच्यासह विश्वस्त मंडळाने केले आहे.