मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेमध्ये मोठी बंडखोरी झाल्यानंतर भाजपच्या मदतीने बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. भाजपसोबत जुळवून घ्यावे, अशी मागणी बंडखोर नेत्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेतील उभी फूट रोखण्यासाठी उद्धव यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. परंतु आता बंडखोरांशिवाय पक्षातील आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकारीही भाजपशी युती करण्याबाबत आग्रही आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने राष्ट्रपती पद निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला आहे. युतीच्या दिशेने हे पहिले पाऊल असल्याचे सांगितले जात आहे. आता पुन्हा भाजप-सेना युती जुळणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात घोडे नेमके कुठे अडले आहे हे बंडखोर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर उपस्थित राहिले होते, यावेळी त्यांनी शिवसेना-भाजप युतीच्या संदर्भात वक्तव्य केल्याने या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाकरे यांच्या भूमिकेचे स्वागतच आहे.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत एनडीएची महत्वाची बैठक राजधानी दिल्लीत पार पडली. या बैठकीला शिंदे गटाकडून दीपक केसरकरांनी हजेरी लावली होती. या बैठकीनंतर मुंबईत दाखल झालेल्या केसरकरांनी दावा केला आहे की, भाजप शिवसेना युतीचे मानापमान नाट्य सुरू आहे. कुणी पुढाकार घ्यायचा यावर सगळे अडले आहे. केसरकर यांच्या दाव्याने पुन्हा भाजप-शिवसेना युती होणार का? उद्धव ठाकरे सर्वकाही सोडून भाजपसोबत जाणार का? अशी चर्चा सुरु आहे.
पहिला फोन कुणी करायचा यावरूनच युती खोळंबली आहे, असे केसरकर म्हणाले. त्यामुळे अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदावरुन फिस्कटलेली शिवसेना आणि भाजपची युती एका फोनने पुन्हा होऊ शकते, अशी शक्यता आहे. केसरकर म्हणाले की, हा वाद आमच्यामध्ये नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचे नाते तोडा, आम्ही ५० जण माघारी येतो असे सांगितले, पण त्यांनी आघाडी तोडली नाही. आता मात्र काही कारणाने आघाडी तुटली आहे. त्यावेळी तरी तुम्ही हा निर्णय घ्या. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आम्हाला एकट्याला निर्णय घेता येणार नाही. त्यावेळी तुम्हाला भाजपचाही विचार करावा लागेल, असेही केसरकर उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले.
केसरकर आणखी पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना लहान भाऊ मानले आहे. मोदींनी 370 हटवून बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केले असून राम मंदिर हे बाळासाहेबांचं स्वप्न होते आणि मोदींनी तेही पूर्ण केले आहे. आता फक्त फोन कुणी करायचा? यावर अडले आहे. तसेच केसरकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार यांनी चार वेळा शिवसेना फोडली. उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी नाईलाजास्तव करावी लागली होती, असेही केसरकर यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरुन केसरकरांवर निशाणा साधलाय. ‘अहो केसरकर किती बोलता पवार साहबां विरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. जिथे आहात तिथे सुखी राहा, असा सूचक इशाराच आव्हाड यांनी केसरकरांना दिला आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, आता शिवसेना-भाजप युती आहेच. एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले आमदार अजूनही शिवसेनेचेच आहेत. आम्ही तर शिंदे यांना रोजच फोन करतो. भाजपने याआधी युती केलीच होती. त्यामुळे पवारसाहेब त्यांच्या सोबत असताना आमच्याकडून फोन जाण्याचा प्रश्नच नाही, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, कोण फोन करणार याबाबत मी सांगू शकत नाही. मात्र माझ्या पक्षाच्या प्रमुखांचा जो निर्णय असेल तो मान्य असेल. आम्ही त्यांच्या निर्णयासोबत असू. युती तुटल्यानंतर त्यांचे पहाटे सत्तांतर घडले, रात्रीचे छुप्या पद्धतीने भेटणे या गोष्टी सर्वांनी पाहिलं आहे. मतदारांना तुम्ही येडे समजता का? असा सवाल देखील पेडणेकर यांनी भाजपला केला.
Again Shivsena and Bjp Alliance initiative which is barrier