मुंबई – सत्ताधारी महाविकास आघाडीतील मंत्र्यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तशी माहिती त्यांनी स्वतःच ट्वीट करुन दिली आहे. त्यामुळे करोना बाधित झालेल्या कॅबिनेट मंत्र्यांची संख्या चारवर गेली आहे.
ठाकूर यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाहीत. तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे की, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.
यापूर्वीच शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना कोरोनाची लागण झाली आहे. तशी माहिती या सर्व मंत्र्यांनी स्वतःहून दिली आहे. आता यशोमती ठाकूर यांनाही बाधा झाली आहे. राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात हे सर्व मंत्री उपस्थित होते. तसेच, गेल्या काही दिवसांपासून या सर्व मंत्र्यांचे विविध सार्वजनिक कार्यक्रम होते. त्यात ते सहभागी झाले. त्यामुळे या सर्वांच्या संपर्कात आलेल्यांची संख्या मोठी आहे.
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे.
मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी.— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) December 31, 2021
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांच्या कुटुंबालाही कोरोनाची लागण झाली आहे. शिवसेना नेते दीपक सावंत हे सुद्धा कोरोना बाधित आहेत. कोरोनाच्या ओमिक्रॉन या अवतारामुळे सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. त्यामुळेच राज्य सरकारने कडक कोरोना निर्बंध लागू केले आहेत.