नवी दिल्ली – दक्षिण अफ्रिकेतून प्रसार झालेल्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा भारतात शिरकाव झाला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये रुग्ण आढळल्यानंतर आता दिल्लीमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंटने बाधित पहिला रुग्ण आढळला आहे. लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात दाखल ३७ वर्षांचा रुग्ण नुकताच टांझानियातून परतला होता. या रुग्णामध्ये गंभीर लक्षणे आढळले नाहीत.
देशातील हा पाचवा ओमिक्रॉनचा रुग्ण आहे. कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे पूर्वी दोन रुग्ण आढळले होते. शनिवारी तिसरा आणि चौथा रुग्ण गुजरातमधील जामनगर आणि महाराष्ट्रातील डोंबिवलीमध्ये आढळला होता. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्याची मागणी केली होती.
दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, की दिल्लीत पहिला ओमिक्रॉन रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत कोविड पॉझिटिव्ह आढळलेले १७ रुग्ण एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओमिक्रॉनने बाधित रुग्णालाही याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या रुग्णाला वेगळ्या वॉर्डात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
https://twitter.com/ANI/status/1467371491637415940?s=20
बाहेरून आलेल्या प्रवाशांची कोविड चाचणी केली जात आहे. आतापर्यंत १७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या संपर्कात आलेले ६ जण आहेत. १२ रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले असून, त्यातील एक रुग्ण ओमिक्रॉनने बाधित असण्याची शक्यता आहे.